एटीएम रिकामे, शेतकरी हैराण… अमळनेर तालुक्यात आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा! , मयूर प्रवीण पाटील, झाडी — शेतकरी पुत्र
1 min read

एटीएम रिकामे, शेतकरी हैराण… अमळनेर तालुक्यात आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा! , मयूर प्रवीण पाटील, झाडी — शेतकरी पुत्र

Loading

एटीएम रिकामे, शेतकरी हैराण… अमळनेर तालुक्यात आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा!

मयूर प्रवीण पाटील, झाडी — शेतकरी पुत्र

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यात सध्या शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतीच्या कामासाठी व दैनंदिन गरजांसाठी पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांना एटीएमसमोर तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. भर उन्हात वृद्ध शेतकरी, महिला व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या आशेने उभे राहतात; मात्र अनेक ठिकाणी एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

बँकांमध्ये चौकशी केल्यानंतर “एटीएममधून पैसे काढा” असे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात एटीएमच बंद किंवा रिकामे असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी 20 ते 30 किलोमीटर अंतर पार करून शहरात येतात. कोणाला बियाणे घ्यायचे असते, कोणाला औषधे, तर कोणाला शेतीच्या कामासाठी मजुरी द्यायची असते; मात्र दिवसभर फिरूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

यासोबतच काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध नसल्याने वाहनधारक शेतकऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम तिन्ही वाया जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे तालुक्यातील या गंभीर समस्यांकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या मूलभूत अडचणी सोडवण्याऐवजी केवळ आश्वासने दिली जात असल्याची चर्चा आता गावागावांत सुरू आहे.

शेतकऱ्यांचा सरळ प्रश्न आहे —
“आमच्या हक्काचे पैसे वेळेवर मिळत नसतील, तर जबाबदारी कोण घेणार?”

आज शेतकरी आर्थिक अडचणी, उन्हातील रांगा आणि अपुऱ्या सुविधांमध्ये भरडला जात आहे. सामान्य शेतकऱ्याच्या या वेदना समजून घेऊन परिस्थिती सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *