आचारसंहितेमुळे रखडलेले महिला पुरस्कार तातडीने द्या – डी. ए. धनगर
![]()
*कर्तबगार महिलांचा सन्मान यावर्षी तरी होईल का?*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दरवर्षी 31 मे रोजी दिला जातो. परंतु गेल्या दोन वर्षापासून आचारसंहितेच्या कारणास्तव शासनाने ग्रामीण महिलांना सन्मानापासून वंचित ठेवले आहे. सदर रखडलेले पुरस्कार यावर्षी तरी थाटामाटात वितरित करावे, अशी मागणी खानदेश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी केली आहे.
9 मे 2023 शासन निर्णयानुसार महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत , गटपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अर्थात 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात , सन्मानित करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार 31 मे 2023 पासून राज्यात अनेक महिलांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ व प्रति महिला पाचशे रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर मात्र गेल्या दोन वर्षापासून लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे सदर पुरस्कार रखडले होते. आचारसंहिता संपल्यानंतर देखील शासनाला जाग आली नाही. संबंधित महिलांना पुरस्कार देण्यापासून सोईस्कर विसर पडला. खरंतर आचारसंहिता संपल्यानंतर सदर पुरस्कारांचे वितरण झाले पाहिजे होते. पण ते झाले नाही त्यामुळे महिलांवर अन्याय झाला. तसेच शासन आदेशाचा अनादर झाला.
यावर्षी तरी या कर्तबगार ग्रामीण महिलांवर अन्याय होऊ नये तसेच ग्रामपंचायत मध्ये योग्य महिलांना सन्मानित करण्यात यावे अशी मागणी आहे. महापुरुषांची जयंती पुण्यतिथी पारंपारिक पद्धतीने आपण साजरी करतो त्यामुळे ग्रामीण कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन सन्मान व्हावा अशी रास्ता अपेक्षा डी. ए धनगर यांनी व्यक्त केली आहे.

