भर उन्हाळ्यात इ.११वी प्रवेशाचा मूळ एल.सी.व गुणपत्रक मिळालेले नसताना अट्टाहास का? विद्यार्थी-पालकांना वेठीस धरणारी प्रवेशप्रक्रिया? , @ प्रा.नंदन वळिंकार (जिल्हाध्यक्ष)डॉ.अतुल इंगळे {जुक्टो जिल्हा उपाध्यक्ष}, प्रा.अर्जुन मेटे {जळगांव महानगर जुक्टो कार्यकारिणी सदस्य}जळगांव:–
![]()
भर उन्हाळ्यात इ.११वी प्रवेशाचा मूळ एल.सी.व गुणपत्रक मिळालेले नसताना अट्टाहास का? विद्यार्थी-पालकांना वेठीस धरणारी प्रवेशप्रक्रिया?
@ प्रा.नंदन वळिंकार (जिल्हाध्यक्ष)डॉ.अतुल इंगळे {जुक्टो जिल्हा उपाध्यक्ष}, प्रा.अर्जुन मेटे {जळगांव महानगर जुक्टो कार्यकारिणी सदस्य}जळगांव:–
महाराष्ट्र राज्यात यंदा इ.११ वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अत्यंत घाईगडबडीत सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच नोंदणी प्रक्रिया सुरू करणे, निकालानंतर लगेच शून्य प्रवेश फेरी सुरू करणे, आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसताना प्रवेशासाठी दबाव निर्माण होणे आणि हे सर्व प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर घडणे — या संपूर्ण प्रक्रियेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.राज्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट सुरू असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० ते ४५ अंशांच्या पुढे गेले आहे.उष्माघातामुळे मृत्यूच्या घटना वृत्तपत्रांमध्ये सातत्याने प्रसिद्ध होत असताना, विद्यार्थी आणि पालकांना वारंवार महाविद्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. “विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा वेळापत्रक महत्त्वाचे का?” असा संतप्त सवाल आता पालकांकडून विचारला जात आहे. यंदा सर्वात मोठा गोंधळ म्हणजे दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच इ.११वी प्रवेश नोंदणी सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वतःचे गुण किती येतील, कोणती शाखा निवडायची, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे याची कोणतीही स्पष्टता नसताना नोंदणी प्रक्रिया सुरू झाली.निकालानंतर विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक वेळ मिळण्याऐवजी त्यांच्यावर तातडीने प्रवेश प्रक्रियेचा ताण टाकण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यातच अनेक विद्यार्थ्यांना अजूनही मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला (L.C.) मिळालेला नाही.तरीदेखील शून्य प्रवेश फेरी सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना हमीपत्र देऊन तात्पुरता प्रवेश घ्यावा लागत आहे. नंतर मूळ L.C. आणि गुणपत्रक मिळाल्यावर पुन्हा महाविद्यालयात जाऊन कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाला किमान तीन वेळा महाविद्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
पहिल्यांदा ऑनलाइन नोंदणी, त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश आणि नंतर मूळ कागदपत्रे जमा करण्यासाठी पुन्हा उपस्थिती — या प्रक्रियेमुळे विशेषतः ग्रामीण भागातील पालकांची मोठी आर्थिक, शारीरिक आणि मानसिक दमछाक होत आहे. बसप्रवास, इंटरनेट सुविधा, सायबर कॅफे खर्च आणि दिवसभर उन्हात होणारी धावपळ यामुळे अनेक पालक त्रस्त झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. वेबसाइट स्लो होणे, OTP न मिळणे, कागदपत्र अपलोड त्रुटी, सर्व्हर डाऊन होणे अशा समस्यांमुळे विद्यार्थी आणि पालकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. “ऑनलाइन प्रक्रिया सुलभतेसाठी की त्रासासाठी?” असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.*
याचबरोबर आय.टी.आय. आणि अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचाही विचार करण्यात आलेला नाही. अनेक विद्यार्थी अकरावी, आयटीआय आणि डिप्लोमा या तिन्ही पर्यायांचा विचार करत असतात. मात्र सर्व प्रवेश प्रक्रिया एकाच काळात सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना यंदापासून दोन वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्रेणी सुधार (Improvement) परीक्षेत अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी नेमकी कशी करावी, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याने सीबीएसई विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
गेल्या वर्षापासून अकरावी प्रवेश प्रक्रियेत राखीव प्रवर्गासाठी एनसीएल (Non Creamy Layer) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्यक्षात एनसीएलची सक्ती प्रामुख्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी असताना अकरावीसाठी त्याचा अट्टाहास का केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तहसील कार्यालयांच्या फेऱ्या, कागदपत्रांची पडताळणी आणि विलंब यामुळे ग्रामीण भागातील पालकांची आणखी गैरसोय होत आहे.
खरं तर इ.११वी प्रवेश प्रक्रिया मे महिन्याच्या शेवटी किंवा सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळाल्यानंतर सुरू करणे अधिक योग्य ठरले असते. विद्यार्थ्यांना निकाल समजून घेण्यासाठी, शाखा निवडीसाठी आणि पालकांशी चर्चा करण्यासाठी किमान काही दिवसांचा अवधी देणे आवश्यक होते.
विद्यार्थी आणि पालकांच्या प्रमुख मागण्या:
१)भर उन्हाळ्यात प्रवेश प्रक्रिया राबवू नये.
२)दहावीचा निकाल आणि कागदपत्र वितरण पूर्ण झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू करावी.
३)प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक मुदत द्यावी.
४)ग्रामीण भागासाठी विशेष ऑफलाइन मदत केंद्रे वाढवावीत.
५)सीबीएसई सुधारित निकालाबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे.
६)नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेटची सक्ती तात्काळ रद्द करा.
सदर सर्टिफिकेट केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच अत्यावश्यक असताना अकरावी प्रवेशासाठी त्याची सक्ती का?यातून नेमके काय साध्य करावयाचे आहे?
७)ऑनलाइन प्रणाली तांत्रिकदृष्ट्या सक्षम करावी.
शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. त्यामुळे केवळ वेळापत्रक पूर्ण करण्याच्या घाईत विद्यार्थ्यांचे आरोग्य, मानसिक स्थिती, ग्रामीण वास्तव आणि पालकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होणे अत्यंत गंभीर बाब आहे. या वाढत्या नाराजीची तातडीने दखल घेऊन प्रवेश प्रक्रियेत आवश्यक बदल करावेत. अशी मागणी प्रा.नंदन वळिंकार (जिल्हाध्यक्ष)डॉ.अतुल इंगळे (जिल्हा उपाध्यक्ष) प्रा.अर्जुन मेटे,प्रा.प्रमोद भोई,प्रा. महेंद्र राठोड,प्रा.दिनेश महाजन, प्रा.प्रवीण महाजन, प्रा.स्वप्नील धांडे,प्रा.गणेश सूर्यवंशी (जळगांव महानगर जुक्टो कार्यकारिणी सदस्य) यांनी केली आहे.

