जे घेतील भरारी, शाळा त्यांच्या दारी!”  यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचा तालुक्यात नवा ट्रेंड
1 min read

जे घेतील भरारी, शाळा त्यांच्या दारी!” यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचा तालुक्यात नवा ट्रेंड

Loading

“जे घेतील भरारी, शाळा त्यांच्या दारी!”

यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचा तालुक्यात नवा ट्रेंड

अमळनेर प्रतिनिधी
माध्यमिक शालांत परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाल्यानंतर तालुकाभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत आपल्या शाळेचा, पालकांचा आणि गावाचा मान उंचावला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आता एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रम तालुक्यात वेगाने रूजू लागला आहे.
तालुक्यातील अनेक शाळांनी पुढाकार घेत संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांनी थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. “जे घेतील भरारी, शाळा त्यांच्या दारी!” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काही वर्षांपूर्वी एखादीच शाळा अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबवत होती. मात्र यंदा अनेक शाळांचा निकाल उल्लेखनीय लागल्याने आणि विद्यार्थ्यांनी उत्तम गुणवत्ता प्राप्त केल्याने सर्वच स्तरातून आनंद व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश शिक्षक वर्गासाठीही समाधानकारक ठरत आहे.
शाळेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची परिसरात विशेष चर्चा होत असते. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घरी जाऊन शुभेच्छा देताना शिक्षकांकडून पुष्पगुच्छ, सत्कार व प्रेरणादायी संवाद साधला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ होत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना प्रेरणा मिळत आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक शाळांनी या उपक्रमाचे अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे. “विद्यार्थ्यांचे यश म्हणजे शाळेचा अभिमान” ही भावना जपत शिक्षक आता शाळेच्या चार भिंतीबाहेर जाऊन पालकांशी थेट संवाद साधताना दिसत आहेत. त्यामुळे शाळा आणि पालक यांच्यातील नाते अधिक दृढ होत आहे.
पालक वर्गाकडूनही या उपक्रमाचे विशेष स्वागत होत आहे. “आपल्या मुलाच्या यशासाठी शिक्षक स्वतः घरी येऊन अभिनंदन करतात, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” अशा भावना अनेक पालक व्यक्त करत आहेत.

चौकट

सामान्यतः विद्यार्थी शाळेत येतात; मात्र शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाण्याचे प्रसंग क्वचितच घडतात. परंतु यशाच्या क्षणी शिक्षक आपल्या दारी येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे “शाळा आपल्या दारी” हा उपक्रम प्रत्यक्षात यशस्वी होताना दिसत असून शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक परिवर्तन घडताना दिसत आहे.

— डी. ए. धनगर

शिक्षक
साने गुरुजी विद्यालय, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *