खडकी पुणे येथे अंडी उबवणी व कुक्कुटपालन विषयक पाच दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न ,अमळनेरचे डॉ. दिपक पाटील यांना उत्कृष्ट प्रात्यक्षिकाबद्दल विशेष गौरव
![]()
खडकी पुणे येथे अंडी उबवणी व कुक्कुटपालन विषयक पाच दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
अमळनेरचे डॉ. दिपक पाटील यांना उत्कृष्ट प्रात्यक्षिकाबद्दल विशेष गौरव
पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, खडकी (पुणे) येथे दिनांक ११ मे ते १५ मे दरम्यान “अंडी उबवणी व कुक्कुट संगोपन” या विषयावर पाच दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या तब्बल ७० प्रशिक्षणार्थींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
या कार्यशाळेत कुक्कुटपालन विकास सुधारित अंडी उबवणी ट्रेनर व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक औताडे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाली शिरसागर यांनी प्रशिक्षणार्थींना अंडी उबवणीपासून ते एक दिवसाच्या पिलांच्या संगोपनापर्यंत सखोल मार्गदर्शन केले. पक्ष्यांचे योग्य आरोग्य राखण्यासाठी विविध वयोगटांमध्ये कोणकोणत्या लसी द्याव्यात, त्यांचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.
विशेष म्हणजे खानदेशातील सातपुडा भागातील गावरान कोंबडीच्या विशेष ब्रीड निर्मितीवर भर देत, कुक्कुटपालन व्यवसायातून शेतकऱ्यांना जोडधंद्याद्वारे आर्थिक सक्षमतेचा मार्ग खुला होऊ शकतो, यावर तज्ज्ञांनी विशेष मार्गदर्शन केले. लहान उद्योगांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांनी वैज्ञानिक पद्धतीने कुक्कुटपालन केल्यास मोठ्या प्रमाणावर यश मिळू शकते, असेही यावेळी सांगण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान अत्याधुनिक स्क्रीनद्वारे सैद्धांतिक माहिती देण्यात आली, तर प्रत्यक्ष अंडी उबवणी केंद्रात एक दिवसाच्या पिलांपासून ते दीड वर्षांच्या पक्ष्यांपर्यंत लसीकरणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
या कार्यशाळेत अमळनेर तालुक्यातील डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील (पशुधन पर्यवेक्षक, माजी सभापती पंचायत समिती अमळनेर, रा. मांडळ) यांनी एक दिवसाच्या पिलांचे यशस्वी लसीकरण करून उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले. त्यांच्या या कौशल्यपूर्ण कामगिरीची दखल घेत समारोप कार्यक्रमात त्यांना विशेष प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जयंत माहोरे (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग पुणे) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते डॉ. दिपक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ. दिपक औताडे, डॉ. दिपाली शिरसागर तसेच श्री पंकज शिंदे (वरिष्ठ लिपिक) उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री तुषार भंडांगे व श्री तन्मय पाषाणकर यांनी प्रशिक्षणार्थींना विशेष सहकार्य केले.
डॉ. दिपक पाटील यांच्या या यशाबद्दल डॉ. वाय. आर. सूर्यवंशी (निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी, अमळनेर), डॉ. रविंद्रनाथ निमसे (विभाग प्रमुख, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी), डॉ. एल. आर. धोंडे पाटील, डॉ. प्रतिभा कोरे (विशेष सर्जन, पशु उपायुक्त लय नाशिक) तसेच डॉ. प्रियंका झोपुडकर यांनी अभिनंदन करून कौतुक केले.

