क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६ साठी काशिनाथ माळी यांची राज्यस्तरीय निवड ,शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दखल; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
![]()
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६ साठी काशिनाथ माळी यांची राज्यस्तरीय निवड
शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दखल; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
धुळे प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील ब्राम्हणवेल येथील कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाचे कर्तव्यदक्ष शिक्षक श्री. काशिनाथ नारायण माळी यांची ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६’ या राज्यस्तरीय प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याने शैक्षणिक, सामाजिक व ओबीसी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणीने त्यांच्या आजवरच्या उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रहिताच्या कार्याची दखल घेत ही निवड जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा, समाजहिताची जाणीव आणि शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदान यामुळे श्री. माळी यांनी शिक्षक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संघटनेकडून देण्यात आलेल्या निवडपत्रात म्हटले आहे की, “आपले भविष्यातील कार्य विद्यार्थी हिताचे, राष्ट्रनिर्मितीचे आणि ओबीसी समाजहिताचे अधिक प्रभावी व्हावे, हीच अपेक्षा असून राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाकडून आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा.”
श्री. काशिनाथ माळी हे केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी रुजविण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे.
यापूर्वीही त्यांच्या कार्याचा गौरव अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी करण्यात आला आहे. त्यामध्ये निसर्ग मित्र समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, देवगाव-देवळी संस्थेचा महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, मुस्लिम स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया – महाराष्ट्रचा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय कला गुणगौरव प्रतिष्ठान औरंगाबादचा महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच फुले-शाहू-आंबेडकर मिशन औरंगाबादचा आदर्श शिक्षक पुरस्कार यांचा समावेश आहे.
या राज्यस्तरीय पुरस्कार निवडीबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यामध्ये संस्थाध्यक्ष तुकाराम महाजन, संस्थासचिव एकनाथ महाजन, धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब एस. के. चौधरी, बापूसाहेब एस. एम. पाटील, शिक्षक नेते संजय पवार, विज्ञान संघटनेचे पी. झेड. कुवर, के. एस. बच्छाव, माळी महासंघाचे हनुमंत आप्पा वाडीले, नगरसेवक सुभाष जगताप, ललित माळी, धुळे जिल्हा माळी समाजाचे अध्यक्ष विलासराव माळी, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासरावजी पाटील, तसेच मा. वासुदेव भाऊ देवरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या श्री. काशिनाथ माळी यांच्या या यशामुळे परिसरातील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

