शेतकी संघाच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी संदीप घोरपडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन
![]()
शेतकी संघाच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी
संदीप घोरपडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन
अमळनेर प्रतिनिधी :
शेतकरी हित, शेतकी संघाची सध्याची परिस्थिती आणि प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ३० मे २०२६ रोजी होणारी शेतकी संघाची निवडणूक सामोपचाराने व बिनविरोध पार पाडावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी केले आहे.
सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून संघाचे हित लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक पक्षातील प्रामाणिक, निष्ठावंत व संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र बसून तोडगा काढावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
घोरपडे यांनी सांगितले की, सध्या प्रचंड उन्हाचा तडाखा असून प्रशासनालाही सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाहेर फिरण्यावर निर्बंध घालावे लागत आहेत. ग्रामीण भागात आगीच्या घटनांत वाढ झाली असून अमळनेर तालुक्यात आतापर्यंत उष्माघाताने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत दिवसभर प्रचार करणे उमेदवारांसाठी धोकादायक ठरू शकते.
तसेच मागील निवडणुकांतील आर्थिक व्यवहारांचे अनुभव लक्षात घेता, या निवडणुकीतही सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. काही पॅनल प्रमुखांकडून उमेदवारांवर आर्थिक दबाव टाकला जात असल्याची चर्चा असून त्यामुळे अनेक उमेदवार मानसिक तणावात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यासाठी प्रत्येक पक्षाने निवडणूक संदर्भातील अधिकृत समिती प्रमुख व पक्षाध्यक्ष अशा दोन-तीन प्रतिनिधींनी एकत्र येऊन चर्चेची प्रक्रिया सुरू करावी, असे आवाहन घोरपडे यांनी केले. या चर्चेतून सर्व पक्षांची मानसिकता जाणून घेऊन नंतर शीर्ष नेतृत्वाला सकारात्मक निर्णयासाठी तयार करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तसेच इतर सर्वपक्षीय नेतृत्वाला सोबत घेऊन तालुक्यात सकारात्मक संदेश देण्याची ही संधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, “मी एक कार्यकर्ता म्हणून सर्व पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना सन्मानाने एकत्र बसविण्यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावण्यास तयार असून, त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत,” असेही संदीप घोरपडे यांनी स्पष्ट केले.
“पहिले पाऊल कोण टाकणार?” हा छोटासा अडथळा दूर करून संवाद सुरू होणे गरजेचे असून, याआधीही अनेक नेत्यांशी चर्चा झालेली आहे. आता हा विषय जाहीरपणे चर्चेत यावा आणि त्यातून काहीतरी चांगले घडावे, यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभिक प्रयत्नात आमदार अनिलदादा पाटील,आपल्या तालुक्याच्या खासदार स्मिताताई वाघ ,माजी आमदार बी एस पाटील, माजी आमदार शिरीष दादा चौधरी, काँग्रेस अध्यक्ष बी.के सूर्यवंशी तसेच पॅनल प्रमुख धनगर दला पाटील या सर्वांनी या प्रक्रियेला होकार दर्शविला होता.
“जय जवान, जय किसान, जय सहकार”
— संदीप घोरपडे

