जनगणना हे राष्ट्रकार्य; प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडा – चार्ज अधिकारी तथा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , अमळनेर येथे प्रगणक व पर्यवेक्षकांची नियोजनबद्ध बैठक संपन्न; जनगणना 2027 संदर्भात सविस्तर मार्गदर्शन
![]()
जनगणना हे राष्ट्रकार्य; प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडा – चार्ज अधिकारी तथा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा
अमळनेर येथे प्रगणक व पर्यवेक्षकांची नियोजनबद्ध बैठक संपन्न; जनगणना 2027 संदर्भात सविस्तर मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी :
आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील इंदिरा भवन येथे शुक्रवार दि. 15 मे 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीत चार्ज अधिकारी जनगणना 2027 तथा तहसीलदार अमळनेर श्री. रुपेशकुमार सुराणा यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करत जनगणनेचे कार्य हे देशाचे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रकार्य असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना तहसीलदार सुराणा म्हणाले की, “जनगणनेचे काम अत्यंत जबाबदारीचे असून ते प्रामाणिकपणे आणि अचूकपणे पूर्ण करा. काम करताना कोणतीही अडचण आल्यास केव्हाही संपर्क साधा. कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका. जनगणनेचे काम अत्यंत सोपे असून नियोजनपूर्वक पार पाडा. सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्याने स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळेत काम करण्यावर भर द्या,” असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण अॅप वापरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. तसेच जनगणनेसाठी आवश्यक साहित्याचे वाटप, प्रगणक व पर्यवेक्षकांची ओळख, आदेश व ओळखपत्र वितरण यासह विविध प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ऐनवेळी उद्भवणाऱ्या मुद्द्यांवरही मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीस श्री. छोटू पाटील, निवासी नायब तहसीलदार, श्रीमती संगीता घोंगडे, सहाय्यक महसूल अधिकारी तथा सहाय्यक जनगणना 2027, श्री. विजय पाटील, टेक्निकल असिस्टंट जनगणना 2027 तसेच महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जनगणना कार्य यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी राखीव कर्मचारी उपस्थित होते






