आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या आंदोलनाला यश ,थकीत मानधन व जननी सुरक्षा योजनेचा मोबदला मिळणार; सीईओ करिष्मा नायर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा
1 min read

आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या आंदोलनाला यश ,थकीत मानधन व जननी सुरक्षा योजनेचा मोबदला मिळणार; सीईओ करिष्मा नायर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा

Loading

आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या आंदोलनाला यश

थकीत मानधन व जननी सुरक्षा योजनेचा मोबदला मिळणार; सीईओ करिष्मा नायर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा

जळगाव : जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर प्रस्तावित धरणे आंदोलनाला अखेर यश मिळाले असून, ऑक्टोबर 2025 पासूनचा थकीत केंद्र हिस्सा मानधन तसेच सन 2023 पासून जननी सुरक्षा योजनेअंतर्गत प्रलंबित मोबदला लवकरच अदा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

आशा सेविका व गटप्रवर्तक प्रतिनिधी रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आशा सेविका व गटप्रवर्तकांना ऑक्टोबर 2025 पासून केंद्र हिस्सा मानधनाचा मोबदला मिळालेला नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच, जननी सुरक्षा योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांची जबाबदारी लाभार्थीची असतानाही, कागदपत्रांच्या अभावामुळे आशा सेविकांना सन 2023 पासून काम करूनही मोबदला मिळत नसल्याचा मुद्दा युनियनने प्रशासनासमोर मांडला.

या मागण्यांसाठी दि. 15 मे 2026 रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्याची नोटीस प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी पुढाकार घेतल्याने तसेच वाढत्या तापमानाचा विचार करून आंदोलन पुढे ढकलण्यात आले आणि निवेदनाद्वारे प्रश्न मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत सीईओ श्रीमती करिष्मा नायर यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2025 पासूनचा केंद्र हिस्सा निधी प्राप्त झाला असून, तो अदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या आठ दिवसांत संबंधित रक्कम आशा सेविकांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. तसेच, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या निर्देशानुसार जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सन 2023 पासूनचा थकीत मोबदला या महिन्याअखेर अदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देण्याच्या सूचनाही सीईओंनी बैठकीतच दिल्या. यापुढे आशा सेविकांचा मोबदला आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरच जमा करण्यात येणार असल्याने सर्वांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले.

या सकारात्मक चर्चेमुळे जननी सुरक्षा योजनेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून, युनियनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना आशा सेविका व गटप्रवर्तकांनी व्यक्त केली.

बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिष्टमंडळात रामकृष्ण बी. पाटील, श्रीमती कल्पना भोई, सुनंदा पाटील, भारती नेमाडे, भारती तायडे, नम्रता पाटील आणि चंद्रकला घोलाणे सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *