जणगणना 2026 साठी अमळनेरमध्ये प्रगणक व पर्यवेक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक, 15 मे रोजी इंदिरा भवन येथे आयोजन; साहित्य वाटप, प्रशिक्षणातील अडचणी व ओळखपत्र वितरण होणार
![]()
जणगणना 2026 साठी अमळनेरमध्ये प्रगणक व पर्यवेक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक
15 मे रोजी इंदिरा भवन येथे आयोजन; साहित्य वाटप, प्रशिक्षणातील अडचणी व ओळखपत्र वितरण होणार
अमळनेर प्रतिनिधी: भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी जणगणना 2026 प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील सर्व प्रगणक (Enumerator) व पर्यवेक्षक (Supervisor) यांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक दि. 15 मे 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता इंदिरा भवन, अमळनेर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व नियुक्त प्रगणक-पर्यवेक्षक यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, बैठकीस उपस्थित राहताना प्रत्येकाने दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
जणगणना प्रक्रिया सुरळीत, अचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात येणार आहे. विशेषतः प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाईल अॅप संदर्भात प्रगणकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर जणगणनेसाठी आवश्यक साहित्याचे वाटप, नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांची अधिकृत ओळख, आदेशपत्र व ओळखपत्र वितरण यासारखी प्रशासकीय कामे देखील पार पडणार आहेत. बैठकीदरम्यान ऐनवेळी उद्भवणाऱ्या विविध मुद्द्यांवरही चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत.
प्रशासनाचे उपस्थित राहण्याचे आवाहन
ही बैठक उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे, जनगणना अधिकारी तथा तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे,
सहाय्यक महसूल जनगणना अधिकारी श्रीमती संगीता घोंगडे व रामेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.
प्रशासनाने सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांनी वेळेचे काटेकोर पालन करून बैठकीस उपस्थित राहावे, तसेच आवश्यक कागदपत्रांसह फोटो आणावेत, असे आवाहन केले आहे.
जणगणना ही देशाच्या विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. त्यामुळे या कामात सहभागी असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमिका महत्त्वपूर्ण असून, आगामी जनगणना कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

