बँकॉकमध्ये भारताचा झेंडा फडकावणाऱ्या कल्पेश महाले यांचा अमळनेरात गौरव सोहळा
![]()
बँकॉकमध्ये भारताचा झेंडा फडकावणाऱ्या कल्पेश महाले यांचा अमळनेरात गौरव सोहळा
अमळनेर प्रतिनिधी :
चाळीसगाव येथील व्हॉइस ऑफ मीडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा नेमबाजी क्षेत्रातील चमकदार व्यक्तिमत्त्व कल्पेश विजय महाले यांनी थायलंडमधील बँकॉक येथे नुकत्याच पार पडलेल्या “इंटरनॅशनल एयर रायफल शूटिंग चॅम्पियनशिप 2026” स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत पुरुष ओपन गटात सुवर्णपदक पटकावत देशासह जळगाव जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
कल्पेश महाले यांच्या स्वागतासाठी आणि अभिनंदनासाठी अमळनेर येथील प्रताप मिल कंपाऊंड परिसरातील बापूराव ठाकरे सर यांच्या निवासस्थानी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते. सकाळी १० वाजेपर्यंत मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचा गौरव केला. यावेळी वातावरणात अभिमान आणि आनंदाची भावना पाहायला मिळाली.
सत्कार सोहळ्यात व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे, राज्य प्रसिद्धीप्रमुख बापूराव ठाकरे, सहसचिव ईश्वर महाजन, संघटक दयाराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी कल्पेश महाले यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच भविष्यातही देशासाठी अशाच प्रकारे उल्लेखनीय यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, ग्रामीण भागातून पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक पटकावणे ही जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. कल्पेश महाले यांचे यश हे युवकांसाठी प्रेरणादायी असून मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जागतिक स्तरावरही यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
कल्पेश महाले यांच्या या दैदिप्यमान यशामुळे चाळीसगाव, अमळनेरसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


