मातृदिनानिमित्त ‘ आदर्श मातांचा गृह – सत्कार ‘ सोहळा संपन्न ‘ डॉ. कलाम पुस्तक भिशी ‘ तर्फे मातांच्या निवासस्थानी जाऊन मातृऋण कृतज्ञतेचा अनोखा उपक्रम
![]()
मातृदिनानिमित्त ‘ आदर्श मातांचा गृह – सत्कार ‘ सोहळा संपन्न
‘ डॉ. कलाम पुस्तक भिशी ‘ तर्फे मातांच्या निवासस्थानी जाऊन मातृऋण कृतज्ञतेचा अनोखा उपक्रम
जळगाव प्रतिनिधी
मातृदिनाच्या औचित्याने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी, जळगाव तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या ‘ आदर्श मातांचा गृह – सत्कार ‘ हा हृद्य उपक्रम दि .१० मे २०२६ रोजी संपन्न झाला. वृक्षसखी तथा वाचन चळवळीच्या कार्यकर्त्या प्रभावती ताई पाटील यांच्या हस्ते यशोदा भगवान भटकर ( वय – ८२) व कमलबाई राणे ( वय – ८३ ) यांचा सत्कार करण्यात आला. वत्सला विश्राम पाटील ( अध्यक्ष, माय माती फाउंडेशन ) व व्रतस्थ वाचक मनिषा जयंत मोडक ( वय – ७७ ) यांचा सत्कार पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मातोश्री सिंधु सुपडू सुतार ( वय – ७६ ) यांचा सत्कार सुवर्णा लुल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.
[ *सत्काराचे स्वरूप* :- आदर्श मातांच्या निवासस्थानी जाऊन प्रथमतः सुपूत्र / सुकन्या तथा कुटुंबीयांच्या हस्ते अग्रपुजन व औक्षण करून घेणे. त्यानंतर पुस्तक भिशीतर्फे मान्यवरांकडून पुजन व औक्षण करून सादर शाल, श्रीफळ तसेच वाचनीय पुस्तकं देऊन सन्मान. मातांचा सश्रद्ध चरणस्पर्श करून निरामय , निरोगी डिर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊन आशिर्वाद घेणे. ]
*सत्कारमूर्ती माता व कार्य*: १) यशोदा भगवान भटकर वय – ८२ ” शिका, संघर्ष करा अन संघटित व्हा ” हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनाचा जीवन मंत्र स्पंदनात रुजवून तत्वनिष्ठ पत्रकारितेतून जनसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडत शासनाला धारेवर धरून नागरीकांना संविधानिक हक्क मिळवून देणारे निर्भिड पत्रकार सुपूत्र प्रा. डॉ. सुधीर भटकर यांना घडविल्या बद्दल गौरव २ ) *कमलाबाई राणे*: कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वैचारिक वारसा कृतीशील जगून आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना ‘ विद्यार्थी सहाय्यक समिती ‘ च्या माध्यमातून निवास व भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून देणारे , तसेच समाजातील दानशूर व सर्वसामान्य भाजी विक्रेत्या माता – भगिनींकडून १६ वर्षांपासून मोफत भाजीपाला व्यवस्था लावून शेकडो विद्यार्थ्यांना घडविणारे प्राचार्य एस.एस. राणे या सुपुत्रास घडविल्याबद्दल गौरव. ३ ) *सौ. वत्सला विश्राम पाटील ( अध्यक्ष, माय माती फाउंडेशन )*: वृक्षसखी , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका संचालिका तसेच वाचन कट्टा चालविणाऱ्या कार्यकर्त्या, २००० वृक्ष जगवणाऱ्या प्रभावती पाटील या सुकन्येला घडविल्याबद्दल गौरव ४ ) *मनीषा जयंत मोडक*: ” उद्योगातून सचोटीने पारदर्शी सेवा देणे हीच समाजसेवा ” हा मुलमंत्र देऊन लघुउद्योजक सुपुत्र घडविल्याबद्दल गौरव.
५ ) *सिंधु सुपडू सुतार* : – पंच्याहत्तरी साजरी करायला पैशांचा अपव्यय न करता एरंडोल येथील ‘ पुस्तकांचा बगीचा ‘ या नगरपालीकेच्या मोफत ग्रंथालयाला ७५ पुस्तकांचे ग्रंथदान करण्यास प्रवृत्त करून वाचन चळवळ राबविणाऱ्या सुपूत्र विजय लुल्हे यास वैचारीक व भावनिक पाठबळ देणे. अंधश्रध्दा निर्मूलन , पर्यावरण व सामाजिक प्रबोधनास निरंतर प्रोत्साहन देण्याबद्दल गौरव
———————————-
वृक्षसखी प्रभावतीताई पाटील सत्कार करतांना मार्गदर्शनात म्हणाल्या की, ” समाजातील संवेदनशील माणुसकी वर्धिष्णू करणारे समाजसेवक घडवणाऱ्या प्रसिद्धी विन्मुख मातोश्रींचा सन्मान करण्याचा आणि आशीर्वाद घेण्याचं सौभाग्य मला लाभलं हा अविस्मरणीय प्रसंग मला समाजसेवा दुप्पटीनं करण्याची ऊर्जा देईल.”
———————————-
*संयोजक विजय लुल्हे यांचे मनोगत*: प्रास्ताविकात आदर्श मातांच्या सत्काराचे उद्दिष्ट्ये सांगतांना विजय लुल्हे म्हणाले, ” व्यासपीठावर दिखाऊ मातृपूजन समारंभ करण्यापेक्षा कौटुंबिक सत्कारातून मातांचा कुटुंबाप्रती आमरण त्याग, सेवा, समर्पण यातील मूल्य तिन्ही पिढ्यांच्या मनी मानसी रुजवणे जास्त संयुक्तिक व मोलाचे आहे.” या माता म्हणजे त्याग, संस्कार व कर्तृत्वाचा त्रिवेणी संगम आहे.
या अनौपचारिक उपक्रमांस आकाशवाणी जळगाव केंद्राचे निवृत्त केंद्र निदेशक तथा साहित्यिक भगवान दादा भटकर, विद्यार्थी सहाय्यक समितीचे सर्वेसर्वा निवृत्त प्राचार्य एस.एस. राणे, गुरुमाऊली सुरेखा राणे, साहेबराव पाटील ( संस्थापक / अध्यक्ष , ज.जि. शासकिय अभियंता सहकारी पतपेढी, मर्यादित , जळगाव ), लघु उद्योजक देवेंद्र मोडक, निवृत्त शिक्षिका दिप्ती मोडक मॅडम , कॅप्टन विश्राम पाटील ( रिटायर्ड ऑर्डिनरी कॅप्टन ), सुहास पाटील ( संस्थापक, माय माती फाउंडेशन ) मान्यवर उपस्थित होते. संयोजक विजय लुल्हे यांनी सत्कार स्विकारल्या बद्दल आदर्श माता व कुटूंबियांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.

