मोबाईलच्या युगात संस्कारांची उजळणी; अमळनेरच्या बालसंस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
संस्कारांची सुंदर शिदोरी; अमळनेरमध्ये बालसंस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर प्रतिनिधी :
गीता परिवाराच्या प्रेरणेने सौ. उर्मिला जगदीश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेले बालसंस्कार शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले. आधुनिक युगात मुलांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त, संस्कार आणि सकारात्मक विचार रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला पालक व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
आज संगणक, मोबाईल आणि इंटरनेटमुळे जग जवळ आले असले तरी संस्कारांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. विभक्त कुटुंब पद्धती, बदलती जीवनशैली आणि वाढता स्क्रीन टाइम यामुळे मुलांच्या जडणघडणीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत बालसंस्कार शिबिरे ही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
“लहान मुले म्हणजे मातीचा गोळा; त्याला जसा आकार दिला जातो तशी त्यांची घडण होते,” या भावनेतून आयोजित या शिबिरात मुलांना संस्कार, प्रार्थना, नैतिक मूल्ये, शिस्त, देशभक्ती, समूहभावना आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांचे मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शर्मिला बडगुजर, भारती पाटील (आधार), पद्मजा पाटील, सुनिता करंजे, वनश्री अमृतकर, मनिषा भांडारकर, गंगा अग्रवाल, सविता पाटील, ज्योती जोशी, नैना नवसारीकर, सुरेखा खैरनार, ॲड. भारती अग्रवाल, अंजू ढवळे आदी महिलांनी मोलाचे सहकार्य केले. आयोजकांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
दरम्यान, शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लोकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा दि. 11 मे ते 15 मे या कालावधीत बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 7 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी हे शिबिर खुले असून इच्छुकांनी नावनोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

