अमळनेरच्या पाणीप्रश्नावर राजकीय आरोप-प्रत्यारोप तापले  आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप; नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्याकडून नियोजनाचा दावा
1 min read

अमळनेरच्या पाणीप्रश्नावर राजकीय आरोप-प्रत्यारोप तापले आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप; नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्याकडून नियोजनाचा दावा

Loading

अमळनेरच्या पाणीप्रश्नावर राजकीय आरोप-प्रत्यारोप तापले

आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप; नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्याकडून नियोजनाचा दावा

अमळनेर (प्रतिनिधी) :
अमळनेर शहरातील तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून विद्यमान आमदार अनिल पाटील आणि नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या गटाकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहेत. एका बाजूला शहरातील नागरिकांना दहा-दहा दिवस पाणी मिळत नसल्याचा आरोप करत आमदार अनिल पाटील यांनी नगरपरिषद सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे, तर दुसरीकडे नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांनी अभ्यासपूर्ण नियोजनामुळे शहरावरील पाणी संकट तूर्तास टळल्याचा दावा केला आहे.
आमदार अनिल पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “जनतेच्या जीवावर नगरपालिकेत सत्ता मिळवून दोन दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन देणारे माजी आमदार आणि पालिकेतील सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. गेल्या दीड महिन्यापासून शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. नियमित कर भरूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने जनतेत संताप आहे.”

पुढे त्यांनी आरोप केला की, “पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून काही भागात कमी दाबाने व दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. काही नगरसेवक स्वतःच्या भागात जादा पाणी सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. जळोद डोहातील पाणी कमी झाल्यानंतरही आवर्तन घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. ४० लाखांचा खर्च झाला तरी तो जनतेसाठीच व्हायला हवा.”

आमदार पाटील यांनी २०० कोटींच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचाही उल्लेख करत, “अमळनेरकरांच्या पुढील ५० ते ६० वर्षांच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन मंजूर केलेल्या योजनेचे कामही सध्या थंडबस्त्यात गेले आहे. या कामाला पुन्हा गती देण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार आहोत,” असे स्पष्ट केले. तसेच शहर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातर्फे आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या गटाकडून मात्र वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे. जळोद–कलाली पाणीपुरवठा योजनेतील जलस्तर खालावल्याने निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात नगरपरिषद प्रशासनाला यश आल्याचा दावा करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा सभापती कैलासतात्या पाटील यांनी सांगितले की, “नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांच्या अभ्यासपूर्ण नियोजनामुळे आवर्तनासाठी होणारा अंदाजे ४५ ते ५० लाख रुपयांचा खर्च वाचला आहे. तापी नदीत पाणी उपलब्ध झाल्याने पुढील काही दिवसांचा प्रश्न मार्गी लागला आहे.”

तसेच अनोरेदे परिसरात अवैध बंधारा व रस्ता निर्माण झाल्याने पाण्याचा प्रवाह अडथळित झाला होता. ही माहिती मिळताच नगराध्यक्षांनी प्रशासनाला तातडीने सूचना दिल्या आणि संबंधित अवैध अडथळे हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचेही सांगण्यात आले.
आज उपाध्यक्ष, सभापती आणि नगरसेवकांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच तापी नदीच्या जळोद पात्रात पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी तात्पुरता बंधारा उभारण्याच्या सूचनाही नगराध्यक्षांनी दिल्या असल्याचे सांगण्यात आले.

एकीकडे शहरातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना दुसरीकडे पाणीप्रश्नावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत असल्याचे चित्र सध्या अमळनेरमध्ये पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *