कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यता रखडल्या; त्वरित मंजुरीची जळगाव जुक्टोची जोरदार मागणी, संचमान्यतेअभावी अध्यापनावर परिणाम; ‘पवित्र पोर्टल’मध्ये रिक्त पदांचा तातडीने समावेश करण्याची मागणी
![]()
कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यता रखडल्या; त्वरित मंजुरीची जळगाव जुक्टोची जोरदार मागणी
संचमान्यतेअभावी अध्यापनावर परिणाम; ‘पवित्र पोर्टल’मध्ये रिक्त पदांचा तातडीने समावेश करण्याची मागणी
जळगाव प्रतिनिधी :
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या संचमान्यता प्रक्रिया पूर्ण होऊन मान्यता वितरित करण्यात आल्या असताना, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यता अद्यापही विभागीय उपसंचालक कार्यालयांकडून देण्यात आलेल्या नसल्याने शैक्षणिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याची खंत जळगाव जुक्टोच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
संचमान्यता रखडल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांचे रोस्टर मंजूर करण्यात अडचणी निर्माण होत असून, मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या शिक्षक पदांची भरती प्रक्रिया ठप्प झाली आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या अध्यापन कार्यावर थेट परिणाम होत असून आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक कार्यालयांनी तातडीने संचमान्यता वितरित कराव्यात तसेच दि. ३१ मेपूर्वी ‘पवित्र पोर्टल’मध्ये रिक्त पदांचा समावेश करण्यात यावा, अशी आग्रही मागणी जळगाव जिल्हा कनिष्ठ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भातील निवेदन आमदार सत्यजितदादा तांबे यांना देण्यात आले. यावेळी प्रा. नंदन वळिंकार, प्रा. सुनील सोनार, प्रा. सुनील गरुड, डॉ. अतुल इंगळे, प्रा. गजानन वंजारी, प्रा. शैलेश राणे, प्रा. स्वप्नील धांडे, प्रा. राहुल वराडे, प्रा. डी. जे. चिकटे तसेच प्रा. सुधाकर ठाकूर उपस्थित होते.
शिक्षक संघटनेने शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली असून, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

