श्री मंगळग्रह मंदिर आता ‘व्हर्च्युअल दर्शन’च्या जगात!,  देशातील पहिले ‘एआय मंदिर’ ठरलेल्या अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरात व्हीआर तंत्रज्ञानाची सुरुवात
1 min read

श्री मंगळग्रह मंदिर आता ‘व्हर्च्युअल दर्शन’च्या जगात!, देशातील पहिले ‘एआय मंदिर’ ठरलेल्या अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरात व्हीआर तंत्रज्ञानाची सुरुवात

Loading

श्री मंगळग्रह मंदिर आता ‘व्हर्च्युअल दर्शन’च्या जगात!

देशातील पहिले ‘एआय मंदिर’ ठरलेल्या अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरात व्हीआर तंत्रज्ञानाची सुरुवात

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिराने धार्मिक पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवत आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंदिराच्या संपूर्ण आभासी दिव्यदर्शनाची अनुभूती देणारा अत्याधुनिक व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) प्रकल्प सुरू करण्यात आला असून, देशातील अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा श्री मंगळग्रह मंदिरात कार्यान्वित झाली आहे.

बुधवार, दि. ६ मे रोजी आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यापूर्वी मार्च महिन्यात केंद्रीय कृषिमंत्री नामदार शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते मंदिरात ‘एआय’ आधारित यंत्रणा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे श्री मंगळग्रह मंदिर हे देशातील पहिले ‘एआय मंदिर’ म्हणूनही ओळखले जात आहे.

घरबसल्या घेता येणार दिव्य दर्शनाचा अनुभव

या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आता जगभरातील भाविक आणि पर्यटकांना मंदिर परिसराचा 360 अंशांतील आभासी फेरफटका मारता येणार आहे. मंदिरातील गाभारा, विविध देवतांची स्थाने, पूजाविधींची ठिकाणे तसेच संपूर्ण परिसर घरबसल्या अनुभवता येणार आहे.

विशेष म्हणजे, मोबाईल किंवा संगणकावर कोणतेही ॲप डाउनलोड न करता ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या परस्परसंवादी स्पर्शपटल केंद्रातूनही ही माहिती पाहता येणार आहे. मोबाईल लिंकद्वारे ही सुविधा मोठ्या प्रमाणावर भाविकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे.

मराठी, हिंदी आणि इंग्रजीत ध्वनी मार्गदर्शन

या डिजिटल भ्रमंतीमध्ये मार्गदर्शित आणि स्वयंसंचलित असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये ध्वनी मार्गदर्शनाची सुविधा असल्याने देश-विदेशातील पर्यटकांना मंदिराचा अनुभव अधिक समृद्धपणे घेता येणार आहे.

वृद्ध भाविक, दिव्यांग नागरिक तसेच परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे. धार्मिक स्थळांचा प्रचार-प्रसार, पर्यटनवृद्धी आणि माहितीचे अचूक सादरीकरण यासाठी अशा प्रकारचे तंत्रज्ञान प्रभावी माध्यम ठरू शकते, असा विश्वास प्रकल्प विकसित करणाऱ्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

भाविक व वाहन व्यवस्थापनालाही मदत

या डिजिटल यंत्रणेच्या सहाय्याने मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या, पर्यटकांची हालचाल आणि वाहन व्यवस्थापनाचेही सुनियोजन करण्यात मदत होणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील व्यवस्थापन अधिक प्रभावी व सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इम्पॅक्ट सोल्युशन्स’कडून प्रकल्प साकार

मुंबई, कोची आणि दिल्ली येथे कार्यालये असलेल्या इम्पॅक्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या तंत्रज्ञान कंपनीने हा प्रकल्प विकसित केला आहे. डिजिटल ट्विन तंत्रज्ञान, जीआयएस नकाशांकन, कृत्रिम बुद्धिमत्ता विश्लेषण आणि अनुभवात्मक पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीने ड्रोन फोटोग्रॅमेट्री, 360 अंशीय स्कॅनर आणि प्रगत 3D रेंडरिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मंदिराची सविस्तर डिजिटल प्रतिकृती तयार केली आहे.

या प्रकल्पाच्या कार्यसंघात चेन्नईचे मिथुन आनंद, मुंबईच्या दीप्तीताई पाटील, वंश चिंदा आणि पुष्कर पुष्प यांचा मुख्य सहभाग आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या उद्घाटन प्रसंगी डांगरीचे माजी सरपंच अनिल शिसोदे, कामगार नेते एल. टी. नाना पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, सौ. आशाताई महाले, ‘ग्लोबल महातेज’चे कार्यकारी संपादक भरत पाटील, ब्युरो चीफ रजनीकांत पाटील, आर्टिस्ट समीर सांगळे यांच्यासह अनेक सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *