आयटीआय निदेशकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती ,मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सकारात्मक बैठक; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराचे कौतुक
1 min read

आयटीआय निदेशकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती ,मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सकारात्मक बैठक; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराचे कौतुक

Loading

आयटीआय निदेशकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती

मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सकारात्मक बैठक; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराचे कौतुक

मुंबई प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटनेच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मा. मंगल प्रभात लोढा यांच्या दालनात झालेल्या या बैठकीमुळे राज्यातील आयटीआय निदेशकांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधान परिषद आमदार मा. ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या विशेष पुढाकारामुळे ही बैठक यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली.

बैठकीस मंत्रीमहोदयांचे खाजगी सचिव अजित देशमुख, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, ओएसडी मठपती साहेब, सहसंचालक नितीन निकम, सहसंचालक अनिल गावित, कक्ष अधिकारी विनोद चौधरी तसेच मंत्रालयीन व संचालनालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष विनोद पाटील, राज्य सरचिटणीस राजेश खडबडे, राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप नवरखेडे, मुंबई विभाग अध्यक्ष अनंत भंगाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संघटनेची भूमिका प्रभावीपणे मांडली.

प्रलंबित विषयांवर सखोल चर्चा

बैठकीदरम्यान आयटीआय निदेशकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्य सरचिटणीस राजेश खडबडे यांनी संघटनेची भूमिका मांडताना प्रत्येक विषयाचा ऐतिहासिक, प्रशासकीय व न्याय्य दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण आढावा सादर केला.

आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी निदेशकांच्या मागण्या रास्त व न्याय्य असल्याचे स्पष्टपणे नमूद करत, “निदेशकांचे प्रश्न केवळ प्रशासकीय नसून मानवी दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे ठाम मत व्यक्त केले. त्यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी थेट संवाद साधत संघटनेच्या मागण्यांचा जोरदार पाठपुरावा केला.

आठ दिवसांत विशेष बैठक घेण्याचे आश्वासन

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संघटनेच्या मागण्यांकडे सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक पाहत, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक पुढील आठ दिवसांत आयोजित करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.

कौशल्य विकास प्रक्रियेत आयटीआय क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, या क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संचालनालयाकडून सकारात्मक भूमिका

संचालक सतीश सूर्यवंशी यांनी संचालनालयाच्या वतीने निदेशकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. अनेक विषयांवरील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले असून उर्वरित विषयांवरही लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

खाजगी सचिव अजित देशमुख व ओएसडी मठपती साहेब यांनीही संघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत, विषय लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

संघटनेकडून आमदार म्हात्रे यांचे विशेष आभार

राज्याध्यक्ष विनोद पाटील यांनी संघटनेच्या वतीने आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली. “आजची बैठक ही संघटनेच्या दीर्घकालीन प्रयत्नांना मिळालेली सकारात्मक दिशा असून, येत्या काळात या विषयांवर ठोस निर्णय होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीच्या शेवटी संघटनेच्या वतीने मंत्रीमहोदय, आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे, संचालक सतीश सूर्यवंशी तसेच उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

एकूणच, महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटनेच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ही बैठक फलदायी व दिशादर्शक ठरल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *