अमळनेरात ‘यादें आशाजी की’ मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ‘स्वर संगीत ऑर्केस्ट्रा’च्या नामफलकाचे अनावरण
1 min read

अमळनेरात ‘यादें आशाजी की’ मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ‘स्वर संगीत ऑर्केस्ट्रा’च्या नामफलकाचे अनावरण

Loading

अमळनेरात ‘यादें आशाजी की’ मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
‘स्वर संगीत ऑर्केस्ट्रा’च्या नामफलकाचे अनावरण

अमळनेर (प्रतिनिधी) :
येथील जुना टाऊन हॉलमध्ये आयोजित ‘यादें आशाजी की’ या विशेष संगीत मैफलीला अमळनेरकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या अजरामर गीतांनी सजलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी विद्या हजारे, तिलोत्तमा पाटील, माधुरी पाटील, सुलोचना वाघ, प्रा. शिला पाटील, प्रा. अशोक पवार, भाऊसाहेब देशमुख आणि राजेंद्रसिंग कालरा, प्रा. रंजना देशमुख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. याच प्रसंगी ‘स्वर संगीत ऑर्केस्ट्रा’ या नावाच्या फलकाचे अनावरण संगीत विशारद वसुंधरा लांडगे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात विविध गायक-गायिकांनी आशाजींच्या गाजलेल्या गीतांची सुरेल मैफल रंगवली. जागृती केळकर यांनी ‘केव्हा तरी पहाटे’ व ‘सलोना सजन’, विद्या पाटील यांनी ‘झूमका गिरा रे’, ‘दम मारो दम’ आणि ‘ओ साथी रे’, तर पूनम पाटील यांनी ‘कोई शहरी बाबू’ व ‘ये मेरा दिल’ ही गीते सादर केली. शुभांगी खंडाळे यांनी ‘आओ हुजूर’, ‘बुगडी माझी’ आणि ‘मन क्यूं महका’ या गीतांनी रंगत वाढवली. प्रमिला पवार यांनी ‘रेशमाच्या रेघानी’ व ‘सजना है मुझे’ ही गीते सादर करून रसिकांची दाद मिळवली.
युगुल गीतांनीही कार्यक्रमात विशेष रंग भरला. जागृती केळकर आणि मिलिंद पाटील यांनी सादर केलेले ‘जाने जा ढूंढता फिर रहा’, तसेच पूनम पाटील व मिलिंद पाटील यांचे ‘दिल्लगी ने दी हवा’ या गीतांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. पूनम पाटील आणि देविदास बिरारी यांनी गायलेले ‘आज रपट जाए’, तसेच विद्या पाटील व देविदास बिरारी यांच्या ‘हवा के साथ साथ’ या गीतांनीही वातावरण भारावून गेले.
या कार्यक्रमाचे नियोजन मिलिंद पाटील यांनी केले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी ओघवत्या शैलीत केले. समारोपावेळी सर्व महिला कलाकारांनी एकत्रित गीत सादर करत सुरेल मैफलीची सांगता केली. आशाजींच्या गीतांनी सजलेल्या या संगीतमय संध्याकाळी रसिकांना जुन्या आठवणींचा सुंदर अनुभव दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *