“लक्झरी स्टॉप की मृत्यूचा सापळा?” – धुळे रस्त्यावर संध्याकाळी जीव धोक्यात!,  रेतीच्या डंपरांची बेधडक वाहतूक, प्रवाशांची प्रचंड गर्दी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप
1 min read

“लक्झरी स्टॉप की मृत्यूचा सापळा?” – धुळे रस्त्यावर संध्याकाळी जीव धोक्यात!, रेतीच्या डंपरांची बेधडक वाहतूक, प्रवाशांची प्रचंड गर्दी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

Loading

“लक्झरी स्टॉप की मृत्यूचा सापळा?” – धुळे रस्त्यावर संध्याकाळी जीव धोक्यात!

रेतीच्या डंपरांची बेधडक वाहतूक, प्रवाशांची प्रचंड गर्दी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

अमळनेर प्रतिनिधी :
शहरातील धुळे रस्त्यावरील लक्झरी स्टॉप हा सध्या प्रवाशांसाठी सोयीपेक्षा धोक्याचे केंद्र ठरत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. दररोज संध्याकाळी आठ ते नऊ या गर्दीच्या वेळेत येथे मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. जवळपास २५ ते ३० लक्झरी बसेस या वेळेत सुटत असल्याने, मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी एकाच ठिकाणी जमा होते.
मात्र, याच वेळेत रेती वाहतूक करणाऱ्या डंपरांची बेफाम ये-जा सुरू असल्याने परिस्थिती अधिकच भयावह बनली आहे. प्रवाशांची गर्दी, बसांची हालचाल आणि डंपरांची धावपळ यामुळे हा परिसर अक्षरशः अपघाताला निमंत्रण देणारा “हॉटस्पॉट” बनला आहे.
याशिवाय, लक्झरी स्टॉपवरून मार्केटच्या मागील भागात जाणारे रस्ते — गुरुकृपा कॉलनी, भालेराव नगर, पाटीलगढी या भागांकडे जाणाऱ्या नागरिकांना या गोंधळात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतुकीचा विस्कळीतपणा आणि जीव मुठीत धरून रस्ता ओलांडण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “अपघात झाल्यावरच जाग येणार का?” असा संतप्त सवालही नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील यांनी प्रशासनाकडे ठोस मागणी करत, लक्झरी स्टॉपसाठी तातडीने पर्यायी सुरक्षित व्यवस्था उभारावी, तसेच या ठिकाणी वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी केली आहे.

एकूणच, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मोठा अपघात होण्याआधीच प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *