तीन आनंदांचा ‘त्रिवेणी संगम’… भालेरावनगर-पाटीलगढीत एकोप्याचा अभूतपूर्व जल्लोष!   वाढदिवसाचा उत्सव, पत्रकारितेचा गौरव आणि सामाजिक कार्याचा सन्मान — एकाच  विचारपिठावर प्रेरणादायी सोहळा
1 min read

तीन आनंदांचा ‘त्रिवेणी संगम’… भालेरावनगर-पाटीलगढीत एकोप्याचा अभूतपूर्व जल्लोष! वाढदिवसाचा उत्सव, पत्रकारितेचा गौरव आणि सामाजिक कार्याचा सन्मान — एकाच विचारपिठावर प्रेरणादायी सोहळा

Loading

तीन आनंदांचा ‘त्रिवेणी संगम’… भालेरावनगर-पाटीलगढीत एकोप्याचा अभूतपूर्व जल्लोष!

वाढदिवसाचा उत्सव, पत्रकारितेचा गौरव आणि सामाजिक कार्याचा सन्मान — एकाच विचारपिठावर प्रेरणादायी सोहळा

अमळनेर प्रतिनिधी
सामाजिक एकोपा, परस्पर जिव्हाळा आणि चांगल्या कार्याला दिले जाणारे प्रोत्साहन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला तो भालेरावनगर-पाटीलगढी येथे आयोजित ‘त्रिवेणी संगम’ सोहळ्यात. सोमवार, दि. ४ मे रोजी सायंकाळी परफेक्ट सलून येथे झालेल्या या कार्यक्रमात तीन वेगवेगळ्या पण तितक्याच महत्त्वपूर्ण घटनांचा एकत्रित उत्सव साजरा करण्यात आला—परफेक्ट सलूनचे संचालक विनोद रमेश जगताप यांचा वाढदिवस, संपादक ईश्वर महाजन यांच्या ‘प्रखर जनसंवाद’ या पाक्षिकाचे आवृत्ती प्रकाशन आणि समाजसेवक नरेंद्र बाळू पाटील यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव.
कार्यक्रमाला भालेरावनगर व पाटीलगढी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सुरुवात झाली ती विनोद जगताप यांच्या वाढदिवसाच्या केक कापण्याने. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे परिसरात त्यांचे वेगळे स्थान निर्माण झाले असून, उपस्थितांनी त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर ‘प्रखर जनसंवाद’ या पाक्षिकाच्या अंकाचे प्रकाशन पार पडले. संपादक ईश्वर महाजन यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या वृत्तपत्राने ‘जनतेचा आवाज, सत्याचा प्रवाह’ हे ब्रीदवाक्य जपत कॉलनीतील प्रश्न, उपक्रम आणि यशोगाथा निर्भीडपणे मांडल्या आहेत. त्यांच्या लेखणीतील धार, मांडणीतील आकर्षकता आणि प्रामाणिक पत्रकारिता यामुळे ‘प्रखर जनसंवाद’ने अल्पावधीतच विश्वासार्हता मिळवली आहे. या निमित्ताने संपादक महाजन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचा सर्वात मानाचा क्षण ठरला तो माजी सरपंच नरेंद्र बाळू पाटील सबगव्हाणकर यांच्या गौरवाचा. ‘श्री संवेदना मंच, अमरावती’ तर्फे प्रदान करण्यात आलेल्या ‘क्रांतीज्योती महात्मा फुले पुरस्कार २०२६’ ने त्यांना सन्मानित करण्यात आले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, तसेच समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची ही दखल मानली जाते. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान केला.
या तिन्ही सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन संयुक्तरित्या गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र काटे यांनी प्रभावी शैलीत केले, तर हरिश्चंद्र कढरे यांनी क्रांतीज्योती महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कॉलनीतील एकोप्यावर आधारित शाहिरी पोवाडा सादर करून वातावरण भारावून टाकले.
डी. एम. पाटील (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) यांनी आपल्या मनोगतात भालेरावनगर-पाटीलगढीतील नागरिकांच्या एकजुटीचे कौतुक करताना सांगितले की, “येथील एकोप्याची भावना आणि चांगल्या कार्याला दिले जाणारे प्रोत्साहन हे समाजासाठी आदर्श आहे. विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची हीच खरी दिशा आहे.”
प्रमुख पाहुणे मा. केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील यांनी तिन्ही मान्यवरांच्या कार्याचे सविस्तर कौतुक करताना नमूद केले की, “विनोद जगताप यांचा सेवाभाव, ईश्वर महाजन यांची प्रखर व निर्भीड पत्रकारिता आणि नरेंद्र पाटील यांचे सामाजिक योगदान हे प्रेरणादायी आहे. अशा व्यक्तींमुळेच समाजाची सकारात्मक दिशा ठरते.”
कार्यक्रमात महेंद्र पाटील सर आणि इंजि. उज्वल पाटील यांनी सुमधुर गायन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलनीतील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेले परिश्रम विशेष उल्लेखनीय ठरले.
शेवटी तिन्ही सत्कारमूर्तींनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानत हा सोहळा संस्मरणीय ठरविल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 


चौकट

‘दर्दी’ उपस्थित, ‘गर्दी’ नाही — एकोप्याचा जिवंत धडा!
१५९ सदस्यांच्या व्हॉट्सॲप समूहातील केवळ संख्या नव्हे, तर ‘दर्दी’ कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती हीच या कार्यक्रमाची खरी ताकद ठरली. “युद्धात सैन्य आणि संकटात साथीदार लागतो” या उक्तीप्रमाणे कॉलनीवासीयांनी एकोप्याचा जिवंत आदर्श घालून दिला.

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ आबा पाटील अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *