लग्नसोहळ्यात उजळलं माणुसकीचं सोनं!
1 min read

लग्नसोहळ्यात उजळलं माणुसकीचं सोनं!

Loading

लग्नसोहळ्यात उजळलं माणुसकीचं सोनं!

शिंदखेडा प्रतिनिधी

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दि. ३ मे रोजी पार पडलेल्या एका लग्नसमारंभात माणुसकीचे हृदयस्पर्शी दर्शन घडले. हळदीच्या आनंदोत्सवात नवरदेवाची सुमारे दहा ग्रॅम सोन्याची अंगठी गर्दीत हरवल्याने एकच खळबळ उडाली. सोन्याचे वाढते दर लक्षात घेता ही बाब अधिकच चिंताजनक ठरली आणि समारंभात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मात्र, या गोंधळातही प्रामाणिकपणाचा दीप तेवत ठेवत खामखेडा येथील विजयाताई वाघ यांनी सापडलेली अंगठी कोणताही मोह न ठेवता नवरदेवाकडे सुपूर्द केली. त्यांच्या या कृत्याने उपस्थितांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली आणि “आजही माणुसकी जिवंत आहे” याची जाणीव सर्वांना झाली.

भडणे येथील राजेंद्र आनंदा पाटील यांच्या मुलाच्या लग्नात घडलेल्या या प्रसंगावेळी राज्यपाल पुरस्कारप्राप्त पोलीस पाटील युवराज माळी, भाऊसाहेब पाटील तसेच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंगठी परत देण्यात आली. विजयाताई वाघ यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गावकऱ्यांतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या घटनेने भडणे परिसरात एक सकारात्मक संदेश दिला असून, भौतिकतेच्या युगातही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपणारी माणसं आजही समाजात आहेत, याचा अभिमान वाटावा असा हा प्रसंग ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *