यात्रा उत्सवात नगरपालिकेची स्वच्छता मोहीम जोरात; भाविकांसाठी स्वच्छतेचा आदर्श उपक्रम
![]()
यात्रा उत्सवात नगरपालिकेची स्वच्छता मोहीम जोरात; भाविकांसाठी स्वच्छतेचा आदर्श उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी :
श्री सद्गुरु संत सखाराम महाराज यात्रा सोहळ्यानिमित्त अमळनेर शहरात भक्तिमय वातावरणासोबत स्वच्छतेलाही प्राधान्य देण्यात येत असून नगरपालिकेची स्वच्छता मोहीम सध्या जोरात सुरू आहे. माजी आमदार शिरीष दादा चौधरी आणि डॉ. रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व सर्व नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे.
यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात दाखल होणाऱ्या हजारो भाविकांसाठी स्वच्छ व प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी अक्षरशः कंबर कसून कामाला लागले आहेत. नगरपालिकेचे कर्मचारी युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम राबवताना दिसत असून, संत सखाराम महाराज वाडी परिसरासह प्रमुख मार्ग, सार्वजनिक ठिकाणे आणि नदीकाठील परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर सुस्थितीत ठेवण्यावर भर दिला जात आहे.
तसेच, यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष नियोजन करण्यात आले असून भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण भासू नये, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था राहावी आणि मूलभूत सुविधांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक स्वतः लक्ष घालून प्रभावीपणे काम पाहत आहेत.
रस्ते स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नियमित फवारणी व निर्जंतुकीकरण यासारख्या उपाययोजनांमुळे यात्रास्थळी स्वच्छतेचा सकारात्मक संदेश दिला जात आहे. भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी प्रशासनाकडून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत.
नगरपालिकेच्या या उपक्रमामुळे “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश प्रत्यक्षात उतरवला जात असून, यात्रेच्या निमित्ताने शहरात स्वच्छतेचा आदर्श निर्माण होत आहे.

