अमळनेरात 14 मे रोजी “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” महानाट्याचा भव्य सोहळा , संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनचे संयुक्त आयोजन; 250 कलाकारांचा थरारक सहभाग
![]()
अमळनेरात 14 मे रोजी “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” महानाट्याचा भव्य सोहळा
संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनचे संयुक्त आयोजन; 250 कलाकारांचा थरारक सहभाग
अमळनेर(प्रतिनिधी):
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात 14 मे रोजी “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृती फाऊंडेशनच्या पुढाकाराने व जयनिल फाऊंडेशनच्या सहकार्याने हे महानाट्य छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सादर होणार आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत युवा उद्योजक तथा आमदार अनिल पाटील व माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांचे सुपुत्र गौतम पाटील यांनी माहिती दिली. सामाजिक जाणिवा जोपासणे आणि विविध क्षेत्रातील उणिवा भरून काढण्याच्या उद्देशाने जयनिल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून, संस्थेच्या कार्याचा शुभारंभ या महानाट्याद्वारे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्कृती फाऊंडेशनचे नाट्यकलाकार निकेश राजपूत यांनी सांगितले की, या महानाट्यात सुमारे 250 कलाकार सहभागी होणार असून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची गाथा जिवंत स्वरूपात प्रेक्षकांसमोर उभी राहणार आहे. सात्विक ठकार लिखित व राकेश राजपूत दिग्दर्शित या महानाट्यात उत्तर महाराष्ट्रातील कलाकारांचा मोठा सहभाग असून, त्यापैकी 100 हून अधिक कलाकार अमळनेर व परिसरातील आहेत.
कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा संस्कृती फाऊंडेशनचा मुख्य उद्देश असून, गेल्या 15 ते 20 दिवसांपासून स्थानिक कलाकारांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. यापूर्वी नंदुरबार व धुळे येथे या महानाट्याचे यशस्वी प्रयोग सादर झाले असून, अमळनेरात चौथा व पाचवा प्रयोग सादर होणार आहे. “महानाट्य ही एक वेगळी संकल्पना असून, प्रेक्षकांसमोर इतिहास ‘लाईव्ह’ स्वरूपात उभा राहतो,” असेही राजपूत यांनी स्पष्ट केले.
तसेच या उपक्रमातून जळगाव व अमळनेर येथे “संस्कृती कला विद्यालय” स्थापन करण्याचा मानस असून, स्थानिक कलाकारांना अभिनय, व्यक्तिमत्व विकास आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
तरुणाईला विशेष आवाहन
गौतम पाटील यांनी पुढे सांगितले की, जयनिल फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, रोजगार मेळावे, व्यक्तिमत्व विकास, शेतकऱ्यांना प्रोत्साहन, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याचा मानस आहे. छत्रपती संभाजी महाराज हे तरुणाईचे प्रेरणास्थान असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक विशेष प्रयोग राखीव ठेवण्यात आला आहे. या प्रयोगासाठी केवळ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, इच्छुकांनी तात्काळ पासेस कार्यालयातून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला नयना कुलकर्णी यांच्यासह संस्कृती फाऊंडेशनचे कलाकार उपस्थित होते.

