साने गुरुजी विद्यालयाचा एन.एम.एम.एस. परीक्षेत नवा उच्चांक, १५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत झळक; यशाचा जल्लोष, पेढे वाटून आनंद साजरा
![]()
📰
साने गुरुजी विद्यालयाचा एन.एम.एम.एस. परीक्षेत नवा उच्चांक,
१५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत झळक; यशाचा जल्लोष, पेढे वाटून आनंद साजरा
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेण्यात येणाऱ्या एन.एम.एम.एस. (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा उल्लेखनीय यश संपादन करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. शाळेतील तब्बल १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून, संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यालयातील ७४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर अंतिम गुणवत्ता यादीत १५ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे.
गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थी :
मोहित रमेश पाटील, शिवम मनोहर पाटील, विराज दीपक पाटील, गोपाल किशोर शिंदे, दीपांशू योगेश पाटील, पियुष अरुण शिंदे, शिवम देविदास पाटील, ललित सुनील ठाकरे, चाणक्य प्रशांत पाटील, मनन राकेश पाटील, नरेश चंद्रकांत महाजन, पुष्कर विनोद शिंदे, हर्षल प्रदीप सोनवणे, भार्गव महेंद्र पाटील, पूरब राजू खंगार.
या सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत दरमहा ₹१००० प्रमाणे एकूण ₹४८,००० ची शिष्यवृत्ती मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील व शिक्षक डी.ए. धनगर यांचे मार्गदर्शन लाभले असून, मुस्ताक शेख व शुभम निकम यांनी तांत्रिक सहाय्य केले. तसेच साने गुरुजी कन्या हायस्कूलची संजना ज्ञानेश्वर अहिरे हिनेही गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून, तिला मुख्याध्यापिका अनिता बोरसे व शिक्षिका मनीषा वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सहसचिव ॲड. अशोक बाविस्कर, संचालक गुणवंत पाटील, भास्करराव बोरसे, किरण पाटील, तसेच मुख्याध्यापक प्रतिनिधी सुनील पाटील, शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी व मुख्याध्यापिका अनिता बोरसे उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी परीक्षेचे उद्दिष्ट व महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या. संचालक ॲड. बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांची मेहनत व पालकांचे सहकार्य यशामागील प्रमुख घटक असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थी विराज पाटील व मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात संदीप घोरपडे यांनी शिष्यवृत्तीचा योग्य वापर शैक्षणिक प्रगतीसाठी करण्याचे आवाहन करत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष उघडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डी. वाय. पाटील यांनी केले. या यशस्वी सोहळ्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
साने गुरुजी विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशामुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची नवी नोंद झाली आहे.

