जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर २ मेपासून सुरू – खासदार स्मिता वाघ
![]()
जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर २ मेपासून सुरू – खासदार स्मिता वाघ
जळगांव प्रतिनिधी:
जळगावकरांसाठी दीर्घ प्रतीक्षेचा अंत झाला आहे. जलसंपदा मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन तसेच केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या सहकार्याने आणि खासदार स्मिताताई वाघ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेे तसेच आमदार राजूमामा भोळे यांच्या मागणीनुसार “अॅलियन्स एअर कंपनीची” दिल्ली-इंदूर-जळगाव व जळगाव -इंदूर-दिल्ली ही विमानसेवा २ मे २०२६ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत आहे. ही सेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार (त्रि-साप्ताहिक) असे दिवशी चालवली जाणार आहे.या सेवेमुळे जळगाव येथील प्रवाशांना दिल्लीसह उत्तर भारतातील विविध शहरांशी थेट व सुसंगत हवाई जोडणी उपलब्ध होणार आहे. तिकीट भाडे ₹३,००० पासून सुरू होत असल्याने सामान्य प्रवाशांसाठीही ही सेवा परवडणारी ठरेल. बुकिंग्स सध्या सुरू झालेल्या आहेत.
खासदार स्मिताताई वाघ यांनी जळगाव विमानतळावर नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र सरकार, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि संबंधित विमान कंपन्यांशी सतत संपर्क साधला होता. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे अखेर ही प्रायोगिक सेवा मंजूर झाली आहे. या सेवेमुळे जळगावकरांना दिल्ली, इंदूर येथे जाणे-येणे सोयीचे होणार असून, उत्तर भारतातील धार्मिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रवास मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. प्रायोगिक कालावधी (१ मे ते ३१ मे) यशस्वी झाल्यास नियमित व विस्तारित सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
जळगाव विमानतळाचे महत्त्व वाढवणारी ही सेवा जिल्ह्याच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे स्थानिक उद्योगपती आणि प्रवासी संघटनांनी व्यक्त केले आहे.

