मारवड कन्या शाळेतील चिमुकलींची शिष्यवृत्ती सरावात दमदार झेप! , नव्या बदलांनंतरही विद्यार्थिनींची जिद्द कायम; २६ एप्रिलच्या परीक्षेकडे सर्वांचे लक्ष
![]()
मारवड कन्या शाळेतील चिमुकलींची शिष्यवृत्ती सरावात दमदार झेप!
नव्या बदलांनंतरही विद्यार्थिनींची जिद्द कायम; २६ एप्रिलच्या परीक्षेकडे सर्वांचे लक्ष
अमळनेर प्रतिनिधी —
महाराष्ट्र शासनाच्या दि. 17-10-2025 च्या निर्णयानुसार यावर्षीपासून प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. इयत्ता 5 वीऐवजी 4 थी आणि 8 वीऐवजी 7 वी साठी परीक्षा घेतली जात असून, संक्रमण काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून यंदा दोन्ही स्तरांच्या परीक्षा स्वतंत्रपणे आयोजित करण्यात आल्या आहेत.
या बदलांमुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी मर्यादित वेळ मिळाला असला तरी जि.प. कन्या शाळा, मारवड येथील विद्यार्थिनींनी आपल्या जिद्दीने वेगळी छाप पाडली आहे. शाळेत इयत्ता 1 ली ते 4 थीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी आधीपासूनच स्पर्धा परीक्षांचे विशेष नियोजन करण्यात आले होते.
मुख्याध्यापक तथा वर्गशिक्षक दत्तात्रय सोनवणे, शिक्षक सुधीर पाटील, चेतना बिऱ्हाडे तसेच माजी विद्यार्थीनी प्राजक्ता साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना नियमित सराव देण्यात आला. मार्च महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय BTS परीक्षेत तब्बल 26 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत उल्लेखनीय उपस्थिती दर्शवली.
यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी कोल्हापूरच्या भुदरगड (गारगोटी) पॅटर्ननुसार सराव संच मागवून पेपर 1 व पेपर 2 घेण्यात आले. कठीण प्रश्न सोडवण्यासाठी विशेष ट्रिक्स शिकवण्यात आल्या. एप्रिल महिन्यातील वाढत्या उष्णतेत आणि सणासुदीच्या वातावरणातही विद्यार्थिनींनी नियमित उपस्थित राहून अभ्यास सुरू ठेवला, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.
आता 26 एप्रिल रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत या विद्यार्थिनींच्या मेहनतीला यश लाभावे आणि त्यांची नावे राज्य, जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत झळकावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट
“इयत्ता 4 थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा! आत्मविश्वासाने परीक्षा द्या, यश नक्कीच तुमचेच असेल.”
दत्तात्रय सोनवणे (मुख्याध्यापक)
चेतना बिऱ्हाडे (उपशिक्षक)
सुधीर पाटील (उपशिक्षक)
जि.प. कन्या शाळा, मारवड ता. अमळनेर

