आखाजीच्या निमित्ताने अहिराणी संस्कृतीचा जल्लोष; योग विद्या धाम शिरपूर येथे ‘अहिराणी लोकवाङ्मय दिन’ उत्साहात साजरा  ,सासुरवासिनींसाठी माहेरची ऊब; गाणी, गौराई पूजन, नाटिका आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत परंपरेचा देखणा संगम
1 min read

आखाजीच्या निमित्ताने अहिराणी संस्कृतीचा जल्लोष; योग विद्या धाम शिरपूर येथे ‘अहिराणी लोकवाङ्मय दिन’ उत्साहात साजरा ,सासुरवासिनींसाठी माहेरची ऊब; गाणी, गौराई पूजन, नाटिका आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत परंपरेचा देखणा संगम

Loading

आखाजीच्या निमित्ताने अहिराणी संस्कृतीचा जल्लोष; योग विद्या धाम शिरपूर येथे ‘अहिराणी लोकवाङ्मय दिन’ उत्साहात साजरा

सासुरवासिनींसाठी माहेरची ऊब; गाणी, गौराई पूजन, नाटिका आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत परंपरेचा देखणा संगम

शिरपूर प्रतिनिधी: अक्षय तृतीया अर्थात ‘आखाजी’ या सणाच्या पार्श्वभूमीवर योग विद्या धाम, शिरपूर येथे खानदेश साहित्य संघ व योग विद्या धाम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अहिराणी लोकवाङ्मय दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक आंब्याच्या पानांनी व झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या झोक्याजवळ डॉ. श्रीकांत वाडीले यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. झोक्यावर गाणी गात विविध मान्यवर महिलांच्या हस्ते अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने उद्घाटन झाले.
यावेळी गौराईचे पूजन करून अहिराणीतील पहिली आरती श्री प्रवीण माळी यांनी सादर केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या महिलांनी ‘आहेर’ नाटिकेद्वारे स्वागतगीत सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तसेच योग शिक्षिका सौ. अनिता न्हावळदे यांच्या समूहाने योगनृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
अहिराणी लोकवाङ्मय दिनाचा ऐतिहासिक प्रवासही यावेळी मांडण्यात आला. फागणे, अमळनेर व शिरपूर येथे पार पडलेल्या पूर्वीच्या कार्यक्रमांचा आढावा श्री सुभाष अहिरे यांनी दिला. प्रास्ताविकात श्री प्रवीण माळी यांनी आखाजी सणाचे खानदेशातील सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत, अहिराणी भाषा ही केवळ बोली नसून पुढील पिढ्यांसाठी संस्कृतीचा भक्कम पाया असल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानासोबतच आपल्या मुळांचा वारसा जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे डॉ. श्रीकांत वाडीले यांनी पतंजलींच्या अष्टांग योगाची माहिती थेट अहिराणी भाषेतून दिली, ज्यामुळे उपस्थितांना वेगळीच अनुभूती मिळाली. तसेच नानासाहेब सुभाष अहिरे यांनी अहिराणी भाषेतील विनोदी शैलीतून लोकसंस्कृतीचे महत्त्व उलगडून सांगत प्रेक्षकांची दाद मिळवली.
‘आहेर’ नाटिकेत उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या माळी गल्लीतील महिला कलाकारांचा सन्मान लाकडी गौराई देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाने सासुरवासिनी महिलांना माहेरची आठवण करून दिली. “योग विद्या धाम म्हणजे आमच्यासाठी माहेरच,” अशा भावना अनेक महिलांनी व्यक्त केल्या.
उपनगराध्यक्ष सौ. संगीता देवरे, सौ. सीमा रंधे यांसह विविध मान्यवरांनी अहिराणी संस्कृतीबद्दल आपले अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक साहित्यिक व कवयित्रींचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योग विद्या धामचे संचालक मंडळ, खानदेश साहित्य संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्री के. बी. लोहार, श्री भावेश पाटील व श्रीमती भावना अहिरे यांनी केले, तर श्री जयवंत पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
एकूणच, आखाजीच्या पावन दिवशी साजरा झालेला हा ‘अहिराणी लोकवाङ्मय दिन’ म्हणजे परंपरा, संस्कृती आणि भावनांचा सुंदर संगम ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *