वारसदार शेतकऱ्यांना दिलासा; कर्जवाटपाचा प्रश्न अखेर मार्गी संचालक मंडळाने मान्य केल्या मागण्या; संमतीपत्रावरच पूर्ववत कर्जवाटप सुरू राहणार
![]()
वारसदार शेतकऱ्यांना दिलासा; कर्जवाटपाचा प्रश्न अखेर मार्गी
संचालक मंडळाने मान्य केल्या मागण्या; संमतीपत्रावरच पूर्ववत कर्जवाटप सुरू राहणार
अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज वाटपाच्या पद्धतीत करण्यात आलेल्या बदलामुळे निर्माण झालेला गोंधळ अखेर दूर झाला असून, वारसदार शेतकऱ्यांच्या मागण्यांना संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सामाईक खात्यातील वारसदारांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.
चालू 2026 आर्थिक वर्षासाठी बँकेने प्रत्येक वारसदारास स्वतंत्र कर्ज देण्याच्या सूचनांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यापूर्वी सर्व वारसदारांनी एका व्यक्तीस अधिकृत करून दिलेल्या संमतीपत्रावर आधारित कर्ज व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र, नव्या निर्णयामुळे कर्जप्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांनी १८ एप्रिल रोजी बँकेचे चेअरमन यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान काही काळ वातावरण तापले असले तरी सर्व बाजूंचा विचार करून अखेर तोडगा काढण्यात आला.
संचालक मंडळाने यापूर्वीप्रमाणेच संमतीपत्र धारक वारसदारांनाच कर्जवाटप करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात कर्ज वितरण पूर्ववत पद्धतीनेच होणार असून, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या आहेत.
या बैठकीस चेअरमन संजय पवार, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार सतीश पाटील, प्रताप हरी पाटील आदी उपस्थित होते. तसेच प्रा. सुभाष पाटील, दिनेश पवार, रोहिदास सुखा पाटील यांच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर करण्यात आले होते.
कोट :
“वारसदार शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, यासाठी बँकेसमोर ठाम भूमिका मांडली. अखेर संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.”
— प्रा. सुभाष पाटील

