वनमहोत्सव सप्ताहात पर्यावरणाचा प्रेरणादायी संदेश , आनंद विहार वृद्धाश्रमात निसर्ग मित्र समितीतर्फे वृक्षारोपण; १०० देशी वृक्ष लागवडीचा संकल्प
![]()
वनमहोत्सव सप्ताहात पर्यावरणाचा प्रेरणादायी संदेश
आनंद विहार वृद्धाश्रमात निसर्ग मित्र समितीतर्फे वृक्षारोपण; १०० देशी वृक्ष लागवडीचा संकल्प
धुळे प्रतिनिधी
वनमहोत्सव सप्ताहानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत निसर्ग मित्र समिती, धुळे व आनंद विहार वृद्धाश्रम, नगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. निसर्गप्रेम, पर्यावरण संरक्षण आणि भावी पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करत परिसरात १०० देशी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भदाणे यांनी यावेळी जाहीर केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन धुळे येथील ज्येष्ठ विधिज्ञ व माजी न्यायाधीश ॲड. जे. टी. देसले, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भदाणे, ज्येष्ठ समाजसेविका सुलोचना अग्रवाल, निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रेमकुमार अहिरे, राज्याचे महासचिव संतोषराव पाटील तसेच आर. आर. सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी देशी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वृक्ष हेच जीवनाचे आधार असून वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक समतोल राखण्यासाठी वृक्षलागवडीसोबत त्यांचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी आनंद विहार वृद्धाश्रमाचे सचिव स्वप्निल भदाणे, निसर्ग मित्र समितीचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर. आर. सोनवणे, आदर्श शिक्षक कांतिलाल देवरे, ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष बोरसे सर, तालुकाध्यक्ष भास्कर पाटील, नक्षत्र प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा रत्नमाला पाटील, आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कापडणे यांच्या प्राचार्या स्वाती पाटील, अस्थिव्यंग दिव्यांग शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल पाटील, निसर्गदादा अहिरे, अक्षय पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात वृद्धाश्रमातील आजी-आजोबा, दिव्यांग शाळेतील विद्यार्थी, संस्थेचे कर्मचारी आणि पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांच्या सहभागातून परिसर अधिक हिरवागार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
“देशी वृक्षांचे संवर्धन हीच भविष्यातील पर्यावरण सुरक्षा आहे,” असे प्रतिपादन करत वृक्षमित्र शशिकांत भदाणे यांनी परिसरात १०० देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प जाहीर केला. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक बांधिलकीचा संदेशही समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला.

