मातीशी नातं जपण्याचा संकल्प’ — अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जनजागराची प्रेरणादायी सांगता , मंगळग्रह मंदिरात भूमिपूजन सोहळा; प्रशासन, तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
‘मातीशी नातं जपण्याचा संकल्प’ — अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जनजागराची प्रेरणादायी सांगता
मंगळग्रह मंदिरात भूमिपूजन सोहळा; प्रशासन, तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवार, दि. 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर ‘भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळ’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या मासिक जनजागर उपक्रमाची सांगता अत्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मातीच्या जतनातून समृद्ध शेती आणि शाश्वत भविष्याचा संदेश देणारा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. महिनाभर विविध उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांमध्ये भूमी सुपोषणाबाबत जागर निर्माण करण्यात आली. त्याची सांगता अक्षय्य तृतीयेच्या मंगल क्षणी भूमिपूजन सोहळ्याने करण्यात आली.
या प्रसंगी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, कृषिभूषण सौ. राजश्री पाटील, कृषी विभागाचे योगेश वंजारी, दिनेश पाटील, दीपक चौधरी, तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी व परिसरातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध गावांतील शेतकऱ्यांनी आणलेली एक मूठ माती एकत्र करून भूमीशी नातं अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. त्यानंतर मंत्रोच्चारात जागेचे शुद्धीकरण, गणपती पूजन व भूमी अभिमंत्रण विधी पार पडले. अभिमंत्रित मातीचे वाटप उपस्थितांना करण्यात आले, जेणेकरून ती आपल्या शेतात टाकून जमिनीची सुपीकता वाढवता येईल.
यावेळी शेतकऱ्यांना जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. ‘भूमी सुपोषण अभियान’चा संदेश गावोगावी पोहोचवून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
या सोहळ्याचे पौरोहित्य शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी केले. सेवेकरी उमेश पाठक, अमोल पाटील व पदमसिंग पाटील यांनी सहकार्य केले.
अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी पार पडलेल्या या उपक्रमाने ‘माती वाचवा, शेती वाचवा’ हा संदेश अधिक दृढ करत शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याची प्रेरणा दिली.

