कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर , फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक, कोळपिंप्री येथेही रथ दाखल
1 min read

कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर , फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक, कोळपिंप्री येथेही रथ दाखल

Loading

कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक, कोळपिंप्री येथेही रथ दाखल

अमळनेर प्रतिनिधी: अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीच्या जनजागराचा रथ आज बुधवार, दि. 15 एप्रिल रोजी सकाळी 8.15 वाजता तालुक्यातील कन्हेरे येथे पोहोचला. त्यानंतर सकाळी 8.15 वाजता चिंचदेवी मंदिरातील सभा मंडपात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या बहुमोल सहकार्यातून कार्यक्रमाचे मुख्य अतिथी तथा लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत अरुण नेरकर यांच्या शुभ हस्ते विधिवतरीत्या भूमीमातेचे पूजन तसेच सेंद्रिय शेतीबद्दलचा जागर करण्यात आला. याप्रसंगी कन्हेरे गाव व मंडळ परिसरातील शेतकऱ्यांनी आपापल्या गावांतील शेतांमधून आणलेल्या मातीचा भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात पूजनाचा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी राजेश प्रकाश बोरसे, उप कृषी अधिकारी दिनेश पाटील, ‌‘आत्मा‌’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण पाटील यांच्यासह मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, अकाऊंट मॅनेजर मनोहर तायडे यांच्यासह श्री मंगळग्रह मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, गणेश जोशी तसेच सेवेकरी राजेंद्र पाटील, उज्ज्वल अहिरराव, दीपक पाटील, शुभम शिसोदे, अक्षय पाटील आदी उपस्थित होते.
सुरूवातीला व्यासपाठीवरील मुख्य अतिथी तथा लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत नेरकर यांच्यासह सर्व मान्यवरांचा मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेरच्या वतीने सुबोध पाटील यांनी श्री मंगळग्रह देवाची प्रतिमा भेट देऊन यथोचित सन्मान केला. तसेच सुबोध पाटील यांनी भूमी सुपोषण चळवळीची पार्श्वभूमी सविस्तरपणे उपस्थितांना समजावून सांगितली. त्यानंतर मंदिराच्या पुरोहितांकडून मंडळातील विविध गावांतून संकलित केलेली एक मूठ माती एका ठिकाणी एकत्रित करून तिचे विधिवतरीत्या पूजन करण्यात आले.
कृषी विभागाचे प्रफुल्ल पाटील यांनी सेंद्रिय शेती तसेच त्यासाठी शासनातर्फे दिली जाणारी मदत, त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना सविस्तरपणे सांगताना सद्यःस्थितीत देशातील शेती, शेतकरी, शेतमजूर व कृषी उत्पन्न आदींची स्थिती रासायनिक खते, कीटकनाशकांचा बेसुमार वापर यामुळे दयनीय झाली आहे. आपले पूर्वज पिढ्यानपिढ्या सेंद्रिय व सकस शेती करीत असल्याने आपल्या मुला-बाळांचे आरोग्य निरामय राहत होते, हे विसरून चालणार नाही, असे सांगितले.
भूषण पाटील यांनी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा रायझोबियम, बीज प्रक्रिया याबद्दलची माहिती संक्षिप्तपणे शेतकऱ्यांना समजावून सांगितली. त्याचप्रमाणे शासनाच्या त्यांच्या मंडळांतर्गत त्यांच्या गावात सुरू असलेल्या जैविक शेतीबद्दलच्या विविध उपक्रमांची माहितीही शेतकऱ्यांना दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीचे महत्त्व सांगणाऱ्या पॉम्प्लेटचेही वितरीत करण्यात आले. तसेच भूमी सुपोषण राष्ट्रीय चळवळीच्या जनजागर अभियानाची अधिकाधिक शेतकऱ्यांना माहिती देण्याचे आवाहनही केले.

(चौकट…)
या गावांनाही दिली जनजागर रथाने भेट
भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीच्या जनजागर रथाने कृषी विभागाच्या बहुमोल सहकार्याने अमळनेर तालुक्यातील कन्हेरे या गावासह मंडळातील फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक, कोळपिंप्री येथेही आज बुधवार, दि. 15 एप्रिल 2026 रोजी भेट दिली. याप्रसंगी तेथील ग्रामस्थांना एकत्र बोलावून भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीचे महत्त्व सांगणाऱ्या पॉम्प्लेटचेही वितरीत करण्यात आले. तसेच ध्वनिक्षेपकावरून या अभियानाचे महत्त्व, कार्याची सविस्तर माहिती तसेच अन्नदात्या भूमीमातेचे महत्त्व पटवत जैविक शेतीला प्रोत्साहन देणे कसे महत्त्वपूर्ण आहे, हे शेतकरी बांधवांना समजावले. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरणही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *