शिक्षण व निरंतर वाचनाने डॉ. बाबासाहेबांना शोषणाविरुद्ध लढण्याचे अक्षय मनोबल दिले- विजय लुल्हे*
![]()
*शिक्षण व निरंतर वाचनाने डॉ. बाबासाहेबांना शोषणाविरुद्ध लढण्याचे अक्षय मनोबल दिले : विजय लुल्हे*
[ साखळी पद्धतीने अभिवाचन उपक्रम विद्यार्थी सहाय्यक समिती जळगाव वस्तीगृहात शुभारंभ प्रसंगी लुल्हे यांचे मार्गदर्शन ]
ग्रंथप्रेमी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त व विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रजत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक अध्यक्ष विजय लुल्हे यांच्या प्रेरणेने व समितीचे सर्वेसर्वा डॉ.एस.एस.राणे ( माजी प्राचार्य ) यांच्या भक्कम पाठिंब्याने साखळी पद्धतीने अभिवाचन उपक्रमाचा शुभारंभ दि. १४ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रविण सोनवणे ( कार्यालय अधिक्षक / वस्तीगृह व्यवस्थापक ) असून प्रमुख अतिथी संदिप शिंपी उपस्थित होते. *साखळी पद्धतीने अभिवाचन उपक्रमाचे अनोखे उद्घाटन :-* ज्ञानपीठ पुरस्कृत कादंबरी ‘ ययाती ‘ ( वि. स. खांडेकर लिखित ), साहित्य अकादमी पुरस्कृत आत्मकथन ‘ काळ्या निळ्या रेषा ‘ ( राजू बाविस्कर लिखित ), वैचारिक ‘ वाचन ‘ व आत्मचरित्र ‘ खाली जमीन वर आकाश ‘ ( डॉ. सुनिल कुमार लवटे लिखित ) ग्रंथांचे अग्रपूजन विजय लुल्हे यांनी करून अभिवाचन उपक्रमाचे अभिनय उद्घाटन केले.
———————————-
उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शनात वाचन चळवळीचे कार्यकर्ते विजय लुल्हे म्हणाले की, ” शिक्षण व निरंतर वाचनाने डॉ.बाबासाहेबांना शोषणाविरुद्ध लढण्याचे अक्षय मनोबल दिले.बाबासाहेबांचे ग्रंथ वाचन व ग्रंथप्रेम केवळ छंद नसून ज्ञान, मानव मुक्ती व सामाजिक परिवर्तनाचे साधन होते. निरंतर वाचनातून ज्ञानार्जन हेच डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्याचे ध्येय होते. उत्पन्नातील १० % रक्कम पुस्तक खरेदीसाठी खर्च करण्याचे आवाहन ते सदैव करीत.बाबासाहेब व्यासंगी ग्रंथप्रेमी होते. केवळ पुस्तकांसाठी ‘ राजगृह ‘ नामक पुस्तकांचे घर बांधणारे ते जगातील एकमेव ग्रंथप्रेमी होते. त्यांच्या ग्रंथालयात ५०००० पेक्षा जास्त पुस्तके होती. ग्रंथालयात इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा, बौद्ध साहित्य, पालीभाषा आणि महत्वपूर्ण विषयांवरील जगातील दुर्मिळ पुस्तके होती.
डॉ. बाबासाहेबांनी ३२ पदव्या प्राप्त केल्या ; अध्ययनाव्यतिरिक्त हजारो ग्रंथ अभ्यासले. २२ ग्रंथांचे लेखन केले. बाबासाहेबांना १२ भाषा अवगत होत्या त्यात प्रामुख्याने संस्कृत , पाली यांसह फ्रेंच, जर्मन, फारसी या भाषांवर प्रभुत्व होते. तसेच ‘ बहिष्कृत भारत ‘ हे पाक्षिक तसेच प्रबुद्ध भारत, मुकनायक, जनता, समता ही वृत्तपत्रे काढून वंचित व शोषितांचे प्रबोधन करून अन्यायाविरुद्ध लढण्याचे त्यांना अक्षय बळ दिले. ” शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा ” हा आत्मोद्धाराचा जीवनमूल्यांसहीत मुलमंत्र दिला.
डॉ.बाबासाहेब ग्रंथांविषयी अत्यंत कळकळीने म्हणत, 📚 ” जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या, कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल.📚📚 मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील त्या दिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. 📚📚📚 एखादा खरा प्रेमी जसे आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो तसे मी माझ्या पुस्तकांवर प्रेम करतो.
———————————-
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरील चरित्र पुस्तक ‘ कर्मवीरायण ‘ या अजित पाटील लिखित पुस्तकाचे प्रथम सन्मानपूर्वक अभिवाचन दिनेश पाटील या विद्यार्थ्याने स्पष्टोच्चार आणि आशयानुषंगे केले. समितीच्या ग्रंथपाल सौ. मिनाताई पाटील व विद्यार्थी तनिष्क ठाकुर यांनी सतीश काळसेकर लिखित ‘ पुस्तकांच्या संग्रहाविषयी ‘ या कवितेचे अनुवाचन केले. प्रस्तावना व सुत्रसंचलन नितेश झोपे अन् आभार प्रदर्शन मयुर भोई यांनी केले.
द्वितीय सत्रात कार्यक्रमानंतर एका अनौपचारिक बैठकित विजय लुल्हे यांनी या महिन्यातील अभिवाचनाचा दिवस व निश्चित वेळ याबाबत तसेच वाचनानंतर संबधित प्रकरणावर एका शब्दात उत्तरे द्या , महत्वपूर्ण सनावड्या व रिकाम्या जागा भरा अशी लघुत्तरी प्रश्नावली काढण्याबाबत तसेच भाऊराव पाटील यांचे सुवचने संकलनाबाबत सांगोपांग खुली चर्चा करून सर्व विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले. चर्चेअंती विद्यार्थ्यांनी साखळी अभिवाचनाचे केलेले नियोजन पुढील प्रमाणे :- साप्ताहिक वाचनाचा वार – रविवार वेळ – रात्री ठिक ९ वाजता अभिवाचन नियोजीत कालावधी – ३० मिनीटे पुढील महिन्यासाठी अभिवाचक : १ ) नितेश झोपे २ ) लोकेश दोडके ३ ) विकास कुंभार ४ ) मयुर भोई
प्रस्तुत अभिवाचन उपक्रमामुळे होणारे वैयक्तिक सर्वांगीण विकास व शालेय गुणवत्ता वाढ या अनुषंगाने वाचनाचे फायदे सांगितले. अभिवाचनासाठी पुढील प्रतिमाह नियोजनाची जबाबदारी, कार्यवाही , शिस्त, प्रश्नात्मक नोंदी, अभिवाचन अहवाल लेखन याबाबत विजय लुल्हे यांनी विद्यार्थ्यांशी केलेल्या सुसंवादातून सर्वानुमते अभिवाचन उपक्रमाचे समन्वयक म्हणून मयुर भोई व नितेश झोपे विद्यार्थ्यांची नियुक्ती केली. यासाठी अंतिम मंजुरीचे शिक्कामोर्तब एस.एस.राणे सर करणार आहेत. आभार प्रदर्शन चारुदत्त महाजन याने केले.

