खेडी ग्रामस्थांकडून निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वासुदेव देसले यांचा जाहीर सत्कार; सुषमाताई देसले-पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी, ग्रामस्थांची आग्रही मागणी, कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा; सामाजिक कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी व्यक्त केला विश्वास
![]()
खेडी ग्रामस्थांकडून निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वासुदेव देसले यांचा जाहीर सत्कार; सुषमाताई देसले-पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी, ग्रामस्थांची आग्रही मागणी
कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा; सामाजिक कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी व्यक्त केला विश्वास
अमळनेर, प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यातील खेडी येथे मा. उपविभागीय पोलिस अधिकारी (निवृत्त) डॉ. वासुदेव देसले यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम करत ग्रामस्थांच्या वतीने भव्य जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी देसले साहेबांनी पोलिस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी वक्त्यांनी डॉ. देसले यांनी आपल्या सेवाकाळात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि जनतेशी सुसंवाद राखत जबाबदारीने काम केल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यशैलीमुळे समाजात विश्वासाचे स्थान निर्माण झाल्याचे गौरवोद्गारही यावेळी काढण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान सौ. सुषमाताई देसले-पाटील यांच्या ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांतील योगदानाचाही विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे आणि सामाजिक कार्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला असून, त्यांनी आगामी पातोंडा-अमळगाव जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवून व्यापक स्तरावर जनतेची सेवा करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.
ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भावना स्वीकारत देसले कुटुंबानेही समाजसेवेची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजहिताच्या कामांमध्ये नेहमीच सक्रिय राहून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास प्रा. नानासाहेब ज्ञानेश्वर पवार, सरपंच आशाताई, पोलिस पाटील सौ. पवार, ग्रामपंचायत सदस्य, विलास शिंदे, डॉ. संजू पवार, जिजाबराव सर, भटू दादा तसेच आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी डॉ. वासुदेव देसले यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करत त्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच देसले कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा विस्तार होत राहावा आणि परिसराच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व लाभावे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.


