पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ,वाचन संस्कृती जपण्याचा संदेश; तरुणांनी पुस्तकांकडे वळावे, मान्यवरांचे आवाहन
![]()
पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
वाचन संस्कृती जपण्याचा संदेश; तरुणांनी पुस्तकांकडे वळावे, मान्यवरांचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी) :
अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. समाजातील समानता, न्याय आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या महामानवाला यावेळी अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी वाचनालयाचे चिटणीस अण्णासाहेब प्रकाश वाघ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यानंतर वाचनालयाचे विश्वस्त बापूसाहेब चंद्रकांत नगावकर यांनी माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी केले.
आपल्या मनोगतात वाचनालयाचे संचालक मंडळ यांनी सांगितले की
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विलक्षण विद्वत्तेचा व कार्याचा गौरव करतांना सांगितले की, बाबासाहेब हे जगातील अत्यंत विद्वान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या विचारांची मशाल घराघरांत पोहोचणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
तसेच, सध्याच्या डिजिटल युगात तरुण पिढी वाचनापासून दूर जात असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी वाचन चळवळ पुन्हा बळकट करण्याचे आवाहन केले. “वाचनालये तरुणांची वाट पाहत आहेत; ज्ञानाची भूक भागवण्यासाठी पुस्तकांकडे वळा,” असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला.
या कार्यक्रमाला वाचक प्रेमी, नागरिक व ग्रंथालयाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साने गुरुजी वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
एकूणच, हा जयंती सोहळा केवळ अभिवादनापुरता मर्यादित न राहता, वाचन संस्कृती जागवणारा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करणारा ठरला.

