हजारो वर्ष नाकारलेला शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे शिक्षण सुधारक महात्मा फुले !!!
1 min read

हजारो वर्ष नाकारलेला शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे शिक्षण सुधारक महात्मा फुले !!!

Loading

हजारो वर्ष नाकारलेला शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे शिक्षण सुधारक महात्मा फुले !!!

भारतामध्ये हजारो वर्षापासून मनुस्मृतीची अलिखित सत्ता होती. या काळात तयार केलेले ग्रंथ वैज्ञानिक दृष्टिकोन सोडवून दांभिक गोष्टीवर भर देणारे होते. विश्व कल्याणाचा संदेश देत होते परंतु चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार या ग्रंथांमधून होत होता. या ग्रंथांमध्ये मनुस्मृति हा ग्रंथ मानवतेला कलंक लावणारा, समतेला नाकारणारा, स्त्री ला व शूद्रांना हक्क नाकारणारा होता. सिंधू संस्कृतीत मातृ सत्ताक पद्धती होती. आर्यांनी या संस्कृतीवर प्रहार केला. त्यांची अबाधित सत्ता राहील अशा पद्धतीचे ग्रंथ निर्माण केले. सुरुवातीला अनेक मूळनिवासी लोकांनी यांना विरोध केला. ज्यांनी विरोध केला त्यांना पराजित करून गुलाम बनविले.प्राचीन भारतामध्ये सर्वप्रथम गौतम बुद्धांनी याविरुद्ध आवाज उठविला. जैन धर्माने मूर्तिपूजा नाकारली. चार्वाक यांनी कर्मकांडाला विरोध केला. विशिष्ट लोकांना शिक्षणाचा हक्क होता. त्यात बहुजन समाजाला डावलण्यात आलेले होते. उच्चवर्णीय लोकांना शिक्षण दिले जात होते. हजारो वर्षापासून मूलनिवासी असलेल्या लोकांना शिक्षण मिळत नव्हते. त्यांनी शिक्षण घेऊ नये यासाठी सर्व बाजूने शिक्षणाची दारे बंद केलेली होती. गौतम बुद्धाच्या कालखंडानंतर पुन्हा मनुवादी सत्ता निर्माण झाली. मनुवाद्यांनी प्रतिक्रांती करून विविध काल्पनिक गोष्टी रचून पुनर्जन्म, नशीब, पाप, पुण्य, स्वर्ग ,नरक यात गुरफटुन ठेवले. पुन्हा मूलनिवासी लोकांनी संघर्ष केलेला दिसून येतो. संतांनी समतेसाठी खूप मोठा प्रयत्न केला. संतांचे वाङ्ममय काल्पनिक करून पुन्हा मनुवाद्यांनी प्रतिक्रांती केलेली आहे. ज्या महापुरुषांनी मनुवाद्यांना नामोहरम केले त्यांचा बदला ते काढत गेले. महात्मा फुले या थोर महापुरुषाचा जन्म पुण्यामध्ये ११ एप्रिल १८२७ ला झाला. त्या काळात पेशवेशाही संपलेली होती . परंतु मनुस्मृतीचे अस्तित्व जिवंत होते.बहुजनावर होणारा अन्याय चालूच होता. अशा काळात महात्मा फुलेंनी बहुजनावर होणारा अन्याय जवळून बघितला. या मनुस्मृतीच्या विचाराला काढण्यासाठी असंख्य ग्रंथांचा, पुस्तकांचा, विचारवंतांचा अभ्यास केला. या सर्व विचारांती सर्वात जास्त अन्याय होणारा वर्ग शोधून काढला. महिलावर्ग या अन्यायाला सर्वात जास्त बळी पडलेला होता. अनिष्ट रूढी, परंपरा तरीही त्या पाळीत होत्या. त्यांच्यावर व्यवस्थेने बंधने लादलेली होती. बहुजनांना शिक्षण नसल्याने त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागृत होत नव्हता. महात्मा फुलेंनी सर्वप्रथम अज्ञानाचे मूळ शोधून त्यावर शिक्षण हा हाच पर्याय आहे हे जाणले. त्यासाठी पुण्यामधील भिडे वाड्यात १८४८ ला पुण्यामध्ये पहिली शाळा काढली. त्या शाळेमध्ये सहा मुली होत्या . त्यामध्ये ब्राह्मण समाजातील उच्चवर्णीय काही मुली होत्या. त्यानंतर महात्मा फुलेंनी अनेक शाळा काढल्या. बहुजनांच्या शिक्षणासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. अनेक अडचणी आल्या परंतु महात्मा फुलेंनी आपली जिद्द सोडली नाही. महात्मा फुलेंना मारण्यासाठी बहुजनातील लोक पाठविले. त्यामध्ये धोंडीबा कुंभार, रानबा महार या लोकांनी महात्मा फुलेंना मारण्यासाठी उच्चवर्णीयांकडून सुपारी घेतलेली होती. महात्मा फुलेंनी नीडरपणे व विनयशीलतेने मारण्यासाठी आलेल्या व्यक्तींचे मन परिवर्तन केले. त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागृत केला. पुढे जाऊन धोंडीबा कुंभार ज्योतिबांच्या शाळेत शिकला. पुढे त्याने संस्कृत विषयाचा अभ्यास करून तो पंडित झाला. त्याने वाद विवादामध्ये शंकराचार्याला हरविले. मनुवाद्यांचे साहित्य हे काल्पनिक साहित्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या विचारी माणूस त्यांना कधीही हरवू शकतो. मनुवाद्यांनी देवधर्माच्या नावाखाली लुबाडले. पाश्चिमात्य देशांमध्ये झालेल्या प्रबोधन योगामुळे जगाला वेगळी दिशा मिळाली. पाश्चिमात्य लोकांचे साहित्य निर्माण झाले. विदेशातील ख्रिश्चनांच्या धर्मोपदेशकाचा, पादरीचा ग्रंथ प्रामाण्यवाद याच्याविरुद्ध विचारवंतांनी आवाज उठविला. सॉक्रेटिस सारख्या विचारवंताने लोकांना प्रश्न विचारास चालना दिली. कोपर्निकस यांनी पृथ्वीच्या अचूक गतीचे ज्ञान जगाला दिले. गॅलेलियो याने दुर्बिणीद्वारे पृथ्वीचा अंडाकृती आकार सिद्ध केला. काही विचारवंतांना विष देऊन ठार मारण्यात आले परंतु त्यांनी आपले विचार सोडले नाही. तरुणांमध्ये जागृती निर्माण झाली. त्याचा सकारात्मक परिणाम भारतामध्ये दिसून आला. भारतामधील महात्मा फुले सारख्या विचारवंतांनी पाश्चिमात्य लोकांचे प्रभावी विचार वाचले. त्यातून मानवतावाद भारतामध्ये महात्मा फुलेंनी उभा केला. मानवाला मिळणाऱ्या पशुहीन वागणुकीमुळे मानवातील वैश्विक मूल्य रुजत नव्हते. उच्चवर्णीय विश्वबंधुत्वाचे विचार आपल्या पुस्तकात ठेवायचे परंतु प्रत्यक्ष वागताना त्यांच्यामध्ये शूद्रां बद्दल विषमता होती. प्राण्याला पाणी पिऊ दिले जात होते परंतु शूद्रांना नाकारले जात होते. बहुजनांना ग्रंथ वाचण्यास बंदी होती. व्यक्ती गुणाने आदर्श न मानता व कोणत्या जातीत जन्मला त्यानुसार त्याला महत्व दिले जात होते. महात्मा फुल्यांनी शिक्षण सर्वांसाठी खुले केल्यावर समाजातील चाललेल्या अनिष्ट रूढी यावर कडाडून प्रहार केला. इंग्रजांकडून सर्वांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हा कायदा मंजूर केला. भारतामधील मनवाद्यांपेक्षा इंग्रज काही गोष्टीने पुढे आलेले होते. त्यामुळे महात्मा फुले यांनी सतीची चाल ही प्रथा इंग्रजांच्या अधिकारात बंद केली. अनेक मनुवादी लोकांना महात्मा फुले यांनी मदत केली. लोकमान्य टिळक यांचे पुत्र श्रीधरपंत हे महात्मा फुलेंना आदर्श मानत होते. लोकमान्य टिळक व न्यायमूर्ती रानडे यांच्या केसेस साठी महात्मा फुले यांनी त्यांना सोडवण्यासाठी आर्थिक मदत केली होती. महात्मा फुले यांच्या योगदानामुळे आज भारताची जी प्रगती दिसते आहे ती केवळ या थोर महापुरुषामुळेच होय. उच्चवर्णीय ब्राह्मण त्या काळातील घरामधील विधवांना त्रास देत होते. अनेक वेळा अशा विधवांना गर्भवती केले जात असे. अशा महिलांना सर्वप्रथम सन्मानाची वागणूक केवळ महात्मा फुले व सावित्रीबाई या दांपत्याने दिली. काशीबाई नावाच्या ब्राह्मणाच्या विधवेच्या पोटी जन्मलेल्या बाळाला पुत्र म्हणून स्वीकारण्याचे धाडस केवळ महात्मा फुले करू शकतात. पुरोहितांची चालत असलेली समाजातील लूट महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाज निर्मिती करून थांबविली. महात्मा फुले हे थोर उद्योजक होते. त्यांनी बांधलेला बोगदा, बिल्डिंग अजूनही आहेत. नाणे तयार करण्याचा कारखाना ही त्यांनी चालू केला होता. महात्मा फुले खूप श्रीमंत होते. त्यांच्याकडे १०० एका जमीन होती.ती इनाम म्हणून पेशवे काळात मिळाले होती. वडिलांचा फुले विकण्याचा फार मोठा व्यवसाय होता. महात्मा फुले पुणे महानगरपालिकेत नगरसेवक होते. उत्कृष्ट शेतीतज्ञ म्हणून त्यांची गणना केली जाते. शेतीमध्ये असंख्य प्रयोग करून महात्मा फुले यांनी आपण खऱ्या अर्थाने माळी असल्याचे सिद्ध केले. असा माळी ज्या माळ्याने बहुजनाच्या मनातील ज्ञानाची मळे फुलविले. समाजाला उच्च दर्जाचा विचार दिला. समाजात चिकित्सकृती निर्माण केली. देवाच्या नावावर चाललेली फसवणूक उघड केली. मूर्ती पूजेच्या नावाने चाललेला काळाबाजार थांबविण्यासाठी विश्वाचा निर्माता कुणी देव नसून निसर्ग नियम हाताळणारा निर्मिक आहे. विश्व नियमांच्या अधीन आहे. या नियमांना महात्मा फुले यांनी निर्मित ही संकल्पना दिली. आज समाजामध्ये वाढलेल्या कर्मकांडाविरुद्ध शिक्षित लोक आवाज उठवित नाही. महात्मा फुलेंचा चिकित्सक विचार आजच्या शिक्षणामध्ये समाविष्ट नाही. तार्किक पद्धतीने जीवन जगण्याचे ज्ञान महात्मा फुलेंच्या शाळांमध्ये मिळत होते. आज ज्योतिष विषयाला शास्त्राचा दर्जा देण्याचे मनुवादी प्रयत्न करीत आहेत. ज्योतिष हे शास्त्र नाही. शास्त्रात कार्यकारण भाव सर्व ठिकाणी समान असतो. ते ज्योतिष विद्येत दिसून येत नाही. आमच्या देशातील सर्वोच्च नेते कर्मकांडाचा पुरस्कार करतात. अनेक नेते बुवा बाजीला प्राधान्य देतात. आपले राजकारणी जर विवेक सोडून कर्मकांडाच्या मागे लागत असतील तर भारताचे भवितव्य धोक्यात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारा विचार अद्याप संपूर्ण भारतात रुजला नाही. जर हा विचार रुजला असता तर भोंदू महाराजांची दादागिरी वाढली नसती. लोक वारे माप पैसा भोंदूंच्या दरबारी खर्च करीत आहे. मध्यप्रदेशात 11000 लिटर दूध नर्मदा नदीमध्ये सोडण्यात आले. अनेक देवस्थानावर कित्येक लिटर तेल वाहिले जाते. अनेक देवस्थानावर कित्येक प्रकारचे दागिने ,सोने ,नाणे पैसा, दान दिला जातो. परंतु देशाच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी पैसा दिला जात नाही. नाशिक येथे भरत असलेल्या कुंभमेळ्याला शासन कोट्यावधी पैसा देत आहे. कुंभमेळ्यातील साधू यांचे योगदान पाहिले असता देशासाठी काहीच नसल्याचे दिसून येते. देशाची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असताना कोणत्याही धर्मासाठी पैसा देणे संविधानाच्या दृष्टिकोनातून चुकीचे आहे. विशिष्ट धर्मासाठी पैसा देणे ही बाब धर्मनिरपेक्ष तत्वाला फारकत घेण्यासारखी आहे. अनेक भोंदू अवैज्ञानिक विधाने करीत असतात. परंतु शिक्षित झालेला समाज त्यांच्याविरुद्ध आवाज उठवत नाही. भोंदूगिरीला लगाम लावण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. जादूटोणा विधेयक पास झाल्यावर त्याची अंमलबजावणी संपूर्णतः होत नाही. भोंदू बाबा हा आपल्या समाजाचा आदर्श होऊ पाहत आहे. सर्वत्र बुद्धी गहाण ठेवून कर्मठ बाबांचा उदो उदो चालू आहे. भोंदू बाबांकडे आलिशान बंगला, गाडी, नौकर चाकर,संरक्षण, त्याचप्रमाणे अत्याधुनिक सोईयुक्त सुविधा आहेत. बाबा इतर लोकांना निस्वार्थी कर्म करण्याचे उपदेश देतात परंतु त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयाची मालमत्ता असते. असे भोंदू आम्हाला काय आदर्श देणार? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यासारख्या संतांचा आदर्श घेतला पाहिजे. कोट्यावधी संपत्तीचा मालक असलेल्या लोकांच्या पुढे समाज झुकत आहे. योगाचे ज्ञान देणारे महाराज आपल्या औषधीने अनेक आजार बरे करण्याचे सांगतात परंतु मोठे आजार त्या औषधीने बरे होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांची बरीच औषधी सिद्ध झालेले आहे. या बाबाकडे कोट्यावधी रुपयाची संपत्ती आहे. शासनाची अनेक ठिकाणी मालमत्ता त्याने मिळवलेली आहे. अशा लोकांना आमचे लोक दान देऊन खऱ्या संताच्या आदर्शाची पायमल्ली करीत आहे. प्रत्येक भोंदू बाबाकडे कोट्यावधी रुपयाची संपत्ती आहे. संताला संपत्तीची काय गरज? संत निरपेक्ष वृत्तीने जगणाऱ्या असतात मग या लोकांकडे एवढी संपत्ती कशासाठी पाहिजे. अशोक खरात या भोंदूने सिद्ध करून दाखवले की आम्ही शिकलो परंतु विवेकी झालो नाही. विवेकी झालो असतो तर आम्हाला भोंदूंकडे जाण्याची गरज पडली नसती. भारतातल्या सर्वात स्तरातील लोक भोंदू अशोक खरात चे भक्त असल्याचे दिसून आले. महात्मा फुलेंचा विचारच आम्हाला विचारप्रवण करू शकतो. त्यांनी दिलेला सत्यशोधकी विचार हाच मूळ भारतीय विचार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन अजूनही भारतात रुजलेला दिसत नाही. महात्मा फुलेंनी एकट्याने समाज बदलवण्याचे धाडस केले. संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी देणाऱ्या ज्योती सावित्रीला मानाचा मुजरा..

उपसंपादक
एस.एच.भवरे
९०७५४१७९३२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *