“कॉकरोच जनता पार्टी”चा सोशल मीडियावर धडाका; पाच दिवसांतच सत्ताधाऱ्यांची झोप उडाली?,  महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि अन्यायाविरोधातील असंतोषाला नवा डिजिटल आवाज , इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विक्रमी पूर; पेज हँग झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह..
1 min read

“कॉकरोच जनता पार्टी”चा सोशल मीडियावर धडाका; पाच दिवसांतच सत्ताधाऱ्यांची झोप उडाली?, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि अन्यायाविरोधातील असंतोषाला नवा डिजिटल आवाज , इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विक्रमी पूर; पेज हँग झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह..

Loading

“कॉकरोच जनता पार्टी”चा सोशल मीडियावर धडाका; पाच दिवसांतच सत्ताधाऱ्यांची झोप उडाली?

महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि अन्यायाविरोधातील असंतोषाला नवा डिजिटल आवाज

इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विक्रमी पूर; पेज हँग झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह..

देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना “कॉकरोच जनता पार्टी” नावाच्या नव्या डिजिटल चळवळीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांत हजारो-लाखो फॉलोअर्स जोडत या पेजने अनेक पारंपरिक पक्षांपेक्षा अधिक चर्चेत स्थान मिळवले असून, युवकांसह सामान्य जनतेमध्ये या चळवळीबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या डिजिटल चळवळीचे संस्थापक अभिजीत दिपके हे महाराष्ट्रातील युवा डिजिटल मीडिया आणि राजकीय संवाद रणनीतीकार (Political Communication Strategist) म्हणून ओळखले जातात. त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पुण्यात पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील नामांकित बोस्टन युनिव्हर्सिटीमधून ‘पब्लिक रिलेशन्स’ विषयात मास्टर डिग्री संपादन केली आहे. डिजिटल पब्लिक मेसेजिंग आणि नॅरेटिव्ह बिल्डिंग या विषयांवर त्यांनी विशेष अभ्यास केला आहे.

सोशल मीडिया आणि डिजिटल कॅम्पेनिंग क्षेत्रातही अभिजीत दिपके हे परिचित नाव मानले जाते. त्यांनी २०२० ते २०२२ दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया प्रचार यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावत दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मेम-आधारित प्रचार मोहिमेत योगदान दिले होते. तसेच दिल्ली मुख्यमंत्री कार्यालयात कम्युनिकेशन्स फेलो आणि दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाचे कम्युनिकेशन्स सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

कॉकरोच जनता पार्टीची स्थापना का झाली?

सध्या देशात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक आणि रोजच्या जगण्याचा खर्च प्रचंड वाढला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, बेरोजगारी वाढत आहे, तर तरुणांच्या हाताला नोकऱ्या मिळत नाहीत. सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसाठी आंदोलन करत आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर बनला असून, वाढती गुन्हेगारी जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.
शिक्षण क्षेत्रातही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. NEET सारख्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनांमुळे वर्षभर रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. “मेहनत करणाऱ्यांना न्याय नाही आणि गैरप्रकार करणाऱ्यांना मोकळीक,” अशी संतप्त प्रतिक्रिया युवकांमधून उमटताना दिसत आहे.

अनेक राजकीय व सेलिब्रेट यांना आपलं मलमूत्र पाजणारा करोडो रुपये हारामाने कमावणाराअशोक खरात,निट परीक्षा प्रश्नपत्रिका फोडणारा मोहरक्या व गेल्या दहा वर्षात करोड रुपयांची मालमत्ता जमा करणारा
मोटे गावकर यांसारख्या विविध प्रकरणांमध्ये न्यायप्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने “तारीख पे तारीख” हीच परिस्थिती असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. कठोर कायद्यांच्या नावाखाली सामान्य माणूस भरडला जातोय, पण प्रत्यक्षात न्याय मिळण्यात विलंब होत असल्याने लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर “कॉकरोच जनता पार्टी” ही केवळ एक विनोदी इंटरनेट मोहीम नसून, तरुणांच्या मनातील असंतोष, बेरोजगारी, परीक्षा घोटाळे आणि व्यवस्थेविरोधातील रोष व्यक्त करणारा उपरोधिक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून पुढे आल्याचे मानले जात आहे.

‘कॉकरोच’ नावामागील कथा

१५ मे २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बनावट पदव्या वापरून नोकऱ्या मिळवणाऱ्या प्रवृत्तीवर भाष्य करताना ‘कॉकरोच’ शब्दाचा उल्लेख केला होता. या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी याच शब्दाचा उपरोधिक आधार घेत “कॉकरोच जनता पार्टी”ची संकल्पना मांडली आणि तरुणांना एकत्र आणण्यासाठी ऑनलाइन नोंदणी मोहीम सुरू केली.

विशेष म्हणजे, या मोहिमेला अवघ्या काही दिवसांत तब्बल 7.8 मिलियन तरुणांनी प्रतिसाद दिल्याचा दावा केला जात आहे. “आळशी आणि बेरोजगारांचा आवाज” अशी या पक्षाची उपरोधिक ओळख तयार करण्यात आली असून, सोशल मीडियावर २४ तास सक्रिय राहणे, व्यवस्थेवर उपरोधिक भाष्य करणे आणि बेरोजगारीविरोधात आवाज उठवणे अशा गंमतीशीर अटी पक्षात सहभागी होण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

लोकशाहीतील विरोधी आवाज दाबला जातोय?

मात्र लोकप्रियतेचा आलेख वेगाने वाढत असतानाच हे इंस्टाग्राम पेज अचानक हँग झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. यानंतर अनेकांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत, “विरोधी आवाज दाबण्यासाठी डिजिटल स्तरावर दबाव टाकला जातोय का?” असा सवाल उपस्थित केला.

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला मत मांडण्याचा आणि सत्तेला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पण जेव्हा सत्तेविरोधात आवाज बुलंद होतो, तेव्हा तो आवाज बंद करण्यासाठी विविध मार्गांचा वापर केला जातो, असा आरोप सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून केला जात आहे.

“कॉकरोच जनता पार्टी” ही आता केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहिलेली नसून, ती सामान्य माणसाच्या मनातील रोषाचे प्रतीक बनत चालल्याची चर्चा समाजात सुरू आहे. येणाऱ्या काळात या चळवळीला अधिक पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अभिजीत दिपके यांनीही ही चळवळ शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने पुढे नेण्यासाठी लवकरच भारतात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत.

“आवाज दाबला जाऊ शकतो, पण जनतेच्या भावना संपवता येत नाहीत,” अशा प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *