महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त- महामानव, क्रांतीज्योती महात्मा फुले यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य-
1 min read

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त- महामानव, क्रांतीज्योती महात्मा फुले यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य-

Loading

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त-
महामानव, क्रांतीज्योती महात्मा फुले यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य-

मानवी इतिहासात स्वातंत्र्य, समता ,बंधुता या तत्त्वावर आधारित क्रांती प्रथम फ्रान्समध्ये झाली. तिथे राजे शाही जाऊन,
” फॉर् दी पीपल बाय दि पीपल ऑफ दी पीपल”
चा नारा दिला जाऊन जगभरात लोकशाहीच्या डंका वाजू लागला. हा काळ म्हणजे ब्रिटिश राज सत्तेचा सुवर्णकाळ होता. त्यांच्या राजवटी वरील सूर्य कधीच मावळत नव्हता. आमच्या देशावर सुद्धा ब्रिटिश शासनाचे राज्य होते. आम्ही गुलाम होतो .त्या अगोदर पेशवाई ने सारी समाज व्यवस्था जातीपातीच्या विळख्यात ,शूद्र अति शुद्राच्या चक्रात ,अज्ञान- अंधश्रद्धेच्या जात्यात भरडून काढली गेली होती .त्यामुळेच जेव्हा या देशावर ब्रिटिश शासन (राज्यकर्ते )आले तेव्हा येथील समाजाने त्यांचे स्वागतच केले. “जळो ती पेशवाई..!”
गरीब बिचारे बाया -बापडे असेच म्हणत होते .सारा समाज पाप पुण्याच्या भोवऱ्यात, उंच नीचतेच्या या चक्रात अडकला होता .ब्राह्मण वर्ग पूर्णतः शिवा- शिवीचा खेळ खेळत होता. पैसे देऊन पुण्य विकत घेतले जात होते .येथील शेठ- सावकार किड्या, मुंग्यांना साखर घालित होते .हजारो ब्राह्मणांना ब्रह्म भोज देत होते.
परंतु शूद्रां साठी ,अति शूद्रांसाठी पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त होते .
सारी समाज व्यवस्था देवाधर्माच्या नावाने नांगविली जात होती .समाज जीवनाच्या तोल ढळला होता .तत्त्वांना ग्लानी आली होती. नीतीच्या विप्रयास झाला होता .आणि माणसाचा पशु झाला होता. अशावेळी या समाज व्यवस्थेला सावरण्यासाठी कुणीतरी महात्मा जन्माला येणे आवश्यक होते..!
समाज पुरुष वेदनेच्या वाटेने चालत राहतात. त्यांच्या वाटेला टाकीचे घाव येतात .मानखंडना येथे पण ते झेलण्या चे सामर्थ्य त्यांच्यात असते .
अशातच साताऱ्या जिल्ह्यातील कडगुण गावी जन्मलेला आईविना हा पोरका मुलगा, फुले गुंफता- गुंफता ,विचारांचा दोरा हातात घेऊन समाजाकडे पाहत होता-
तो समाज कसा होता तर…!
विद्या विनामती गेली
मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली
गती विना वित्त गेले
वित्त विना शूद्र खचले
एवढे अनर्थ एका अविद्येने केले

सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी अगोदर समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर केली पाहिजे. इथल्या समाजात प्रत्येक गोष्ट धर्माच्या नावाखाली ,देवाच्या नावाखाली केली जात होती. वैज्ञानिक दृष्टी शून्य होती .विचार करण्याचा मनाच्या कप्पा पूर्णतः बंद होता.
लोकांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांच्या अंत:करणात शिरकावा करून त्यांना शिकवावे लागेल. हे क्रांतीज्योती महात्मा फुले यांनी जाणले .समाजात सत्य, अहिंसा, बंधुभाव या सद्गुणाचा प्रसार करण्यासाठी, व्यक्तिमत्त्वाच्या विकास घडवून आणण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे होते .हे त्यांनी जाणले. त्यासाठीच त्यांनी सावित्रीबाई फुले यांना सोबतीला घेऊन सन 1848 साली भिडें च्या वाड्यात शूद्र- अति शूद्रांची मुलींची शाळा प्रथम काढली .
मित्राच्या लग्नाच्या वरातीत शूद्र असल्याच्या कारणावरून मान खंडानां, अपमान झाला. हिंदू समाजातील जातीचे ग्रहण सुटत नाही तोपर्यंत समतेच्या प्रकाश पडणार नाही. समते शिवाय” स्वराज्य” ही राजकीय “आताषबाजी” ठरेल .राजकीय गुलामगिरी जाऊन सामाजिक गुलामगिरी राहणार ..!हे महात्मा फुले जाणून होते .त्यामुळे समाज जागृती साठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाची हत्यार आहे. त्याचबरोबर धर्माच्या नावावर पोट भरणाऱ्या पुरोहित वर्गाकडून या समाजाची सुटका करण्यासाठी त्यांनी धर्माची नांगी ठेचली .सापाला मारायचे असेल तर त्याच्या शेपटीवर न मारता त्याच्या तोंडावर प्रहार करावा म्हणजेच तो नामोहरण होईल. त्याचप्रमाणे त्यांनी धर्माचे स्तोम कमी करण्यासाठी पोथ्या- पुराने ही सामाजिक विषमता पसरविणारी वाळवी आहे. त्यांनी देव नाकारण्या पेक्षा पुरोहित वर्गाला नाकारले..! आणि अज्ञात निर्मिका ला ईश्वरीय शक्ती मानली..!
एकाच वेळी एका आघाडीवर लढावे लागले तर हे सामाजिक विषमतेचे युद्ध आपण जिंकू शकणार नाही. हे ओळखून त्यांनी प्रत्येक चांगले विचार नुसते बोल घेवडे पणे बोलून दाखविण्या पेक्षा प्रत्यक्ष कृतीत उतरवले .सामाजिक परिवर्तनासाठी” सार्वजनिक सत्य धर्माची” स्थापना केली. त्याच पद्धतीने ईश्वरीय शक्तीची पूजा ,लग्न विधी ,घरभरणी करण्यासाठीचे विधी कसा करावा हे ठरविले .विधवा, परिपत्या, फसविलेल्या भगिनीं च्या बालकांसाठी अनाथालय काढली .
साहित्य हे समाज जीवनाचे अविभाज्य अंग आहे .हे पुढच्या पिढीसाठी आपल्या इतिहासाचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळेच त्यांनी साहित्य निर्मिती सुद्धा केली. तृतीय रत्न ,छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, ब्राह्मणाचे कसंब, गुलामगिरी, शेतकऱ्यांच्या आसूड वगैरे साहित्याची निर्मिती केली .
महात्मा फुले तत्वांनी भागले होते .तत्त्वपूर्ती साठी ते समाजाला भिक घालत नव्हते. म्हणून धार्मिक गुलामगिरी विरुद्ध बंडाचे निशाण फडकविणाऱ्या फुल्यांनी वेद, मूर्ती पूजा या धार्मिक बाबींवर वैचारिक हल्ला आयुष्यभर केला. त्यासाठी ते म्हणतात –

आता तरी तुम्ही शुद्रा भोंदू नका
ज्योतिबाच्या ठोका ऐकुनिया

असे आपले महामानव महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यभर चंदना सारखे झिजले माणसाला माणूसपण मिळवून देण्याच्या युद्धातील विजयाची पताका आपण सर्व महामानवा चे अनुयायी होऊन फडकवत ठेवू .
हीच आजच्या दिवसाला अपेक्षा….!

गोकुळ बागूल
21, टेलिफोन कॉलनी,
अमळनेर.
मो.9422276140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *