भूमीमातेच्या सुपोषणासाठी जनजागर रथाची अमळनेरातून भव्य सुरुवात , प्रांताधिकारी भंगाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; 156 गावांत जैविक शेतीचा जागर
![]()
भूमीमातेच्या सुपोषणासाठी जनजागर रथाची अमळनेरातून भव्य सुरुवात
प्रांताधिकारी भंगाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; 156 गावांत जैविक शेतीचा जागर
अमळनेर प्रतिनिधी:
भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीच्या जनजागर रथाचे शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता गणपती बाप्पांचे स्तवन करीत मंत्रोच्चारासह विधिवत पूजा-अर्चेसह श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे, अमळनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, अमळनेर कृषी विभागाचे मंडल अधिकारी अविनाश खैरनार, उप कृषी अधिकारी योगेश वंजारी, दिनेश पाटील, अमोल कोठावदे तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा रथपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मुख्य अतिथी प्रांताधिकारी भंगाळे यांनी हिरवा झेंडा दाखवत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जनजागर रथ मार्गस्थ करण्यात आला. यावेळी समाजातील विविध घटकांतील मान्यवर, तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी व मंदिरातील भाविक उपस्थित होते.
या अभियान चळवळीचा जागर उद्या शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 पासून अमळनेर तालुक्यातील सहा मंडळांतील 156 गावांना भेट देत या रथाच्या माध्यमातून केला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे बहुमूल्य सहकार्य लाभले असून, 6 मंडळांतील एका प्रमुख गावात अशा एकूण 6 गावांत भूमीमाता पूजनाचा कार्यक्रमही होणार आहे.
सर्वांसाठी जीवनदायिनी असलेल्या भूमीमातेचा चैत्र शुद्ध वर्ष प्रतिपदेला अर्थात गुढीपाडव्याला जन्मदिवस असतो. त्या अनुषंगाने अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 19 मार्च 2026 या मंगलदिनी केंद्रीय कृषिमंत्री मा. ना. श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ श्री मंगळग्रह मंदिरातून करण्यात आलेला आहे. याप्रसंगी गावागावांतून आलेल्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भूमीमातेचे विधिवत मंगलमय पूजन करण्यात आले. तसेच मंत्री महोदयांनी प. पू. स्वामी नृसिंह विजयेंद्र सरस्वतीजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्री. भागैयाजी, अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी, उपाध्यक्ष डॉ. गजाननजी डांगे, पद्मश्री तथा कृषक शास्त्रज्ञ सुभाषजी शर्मा, महाराष्ट्रातील मंदिर महासंघाचे संयोजक सुनीलजी घनवट, केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन, जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांकडून जैविक शेती उत्पादनाचा संकल्प करवून तशी शपथही त्यांना देवविली. याचवेळी मंत्री श्री. चौहान यांच्यासह विविध महानुभावांनी या राष्ट्रीय अभियानाच्या चळवळीत समाजातील सर्व घटकांनी सहभागी होऊन अन्नदात्या भूमीला आई मानून जैविक शेती करण्याचे आवाहनही यावेळी केलेे होते. त्याचाच पुढील भाग म्हणून हे अभियान आता गावागावापर्यंत पोहोचविले जाणार आहे.
आपला परम पवित्र भारत देश कृषिप्रधान आहे. मात्र, सद्यःस्थितीत देशातील शेती, शेतकरी, शेतमजूर व कृषी उत्पन्न आदींची स्थिती रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा बेसुमार वापर झाल्याने दयनीय झाली आहे. आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या सेंद्रीय व सकस शेती करून त्यात पारंपरिक बियाण्यांचा वापर करून देश समृद्ध ठेवला होता. त्यामुळेच आपल्या मुला-बाळांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहत होते, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आपल्या देशातील कृषी क्षेत्राला गतवैभव व निरामयता प्राप्त करून देण्यासाठी विषारी व कुपोषित झालेल्या भूमीमातेला सुपोषित करणे अत्यंत आवश्यक आहे. या राष्ट्रव्यापी अभियानाच्या गंगेत न्हाऊन निघण्यासाठी प्रत्येक गाव-खेड्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या अभियानाचे महत्त्व वाढवत बळ द्यावे, असे आवाहन अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांनी केले आहे.
आजपासून गावागावांत जनजागर
उद्या, दि. 11 एप्रिल 2026 पासून भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीचा जनजागर रथ गावागावांत पोहोचणार आहे. यामध्ये अमळनेर तालुक्यातील
जनजागर अभियानाची सुरूवात मंगरूळ या गावातून केली जाणार आहे. यावेळी जनजागर रथातून ध्वनिक्षेपकावरून भूमी सुपोषण अभियानाचे महत्त्व, कार्य व भूमी सुपोषण करण्यासंदर्भात सविस्तर माहिती तसेच अन्नदात्या भूमीमातेचे महत्त्व पटवत जैविक शेतीला प्रोत्साहन देणे कसे महत्त्वपूर्ण आहे, हे शेतकरी बांधवांना समजावले जाणार आहे. दिवसभरात साधारपणे एकूण 10 गावांना जनजागर रथ भेट देणार आहे.

