जावेद अहमद यांच्यासारखे जवान हे राष्ट्राची खरी शक्ती; त्यांचा त्याग आणि शौर्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1 min read

जावेद अहमद यांच्यासारखे जवान हे राष्ट्राची खरी शक्ती; त्यांचा त्याग आणि शौर्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Loading

*जावेद अहमद यांच्यासारखे जवान हे राष्ट्राची खरी शक्ती; त्यांचा त्याग आणि शौर्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

उग्रवाद्यांच्या गोळीबारात जखमी होऊनही कर्तव्य निभावले; 74% अपंगत्वावर मात करत देशसेवा सुरूच

*जळगाव दि. – १० एप्रिल : कठीण आणि जीवघेण्या परिस्थितीतही कर्तव्य पार पाडणे हीच खरी देशभक्ती असून गोळीबारात गंभीर जखमी होऊनही जबाबदारी पूर्ण करणारे जावेद अहमद हे खरे वीर आहेत. त्यांच्या अदम्य साहसाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजना’ अंतर्गत ₹60 लाखांची आर्थिक मदत प्रदान केली असून ही मदत म्हणजे त्यांच्या शौर्याला दिलेला सन्मान आणि कृतज्ञतेची भावना आहे. “देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांचे शौर्य, त्याग आणि समर्पण हे अमूल्य आहे. . जावेद अहमद यांच्यासारखे जवान हे राष्ट्राची खरी शक्ती असून त्यांचा त्याग आणि शौर्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, शासनाने त्यांच्या शौर्याची दखल घेऊन महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजने अंतर्गत ही आर्थिक मदत प्रदान केली आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*

ते पुढे म्हणाले की, जवानांच्या त्यागामुळेच देश सुरक्षित आहे, ही जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे. जावेद अहमद यांच्यासारख्या वीरांकडून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी आणि देशसेवा ही सर्वोच्च सेवा मानून त्यासाठी आवश्यक असलेली जिद्द व निष्ठा जोपासावी. अशा शूर जवानांच्या सन्मानासाठी शासन नेहमीच तत्पर राहील, असा विश्वासही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावचे सुपुत्र व सीआरपीएफचे जवान जावेद अहमद यांच्या अदम्य शौर्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजना’ अंतर्गत ₹60 लाखांची आर्थिक मदत मंजूर केली असून, या मदतीचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

*यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की, “जावेद अहमद यांच्यासारख्या जवानांमुळेच देश सुरक्षित आहे. त्यांच्या त्यागाचा सन्मान करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि प्रशासन त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभे राहील.*

सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक 31 मार्च 2026 अन्वये युद्ध, युद्धजन्य परिस्थिती तसेच देशांतर्गत सुरक्षा मोहिमांमध्ये जखमी होऊन अपंगत्व आलेल्या जवानांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जावेद अहमद यांना ही मदत मंजूर करण्यात आली होती. सध्या ते पुणे येथे कार्यरत असून, त्यांच्या शौर्याचा आणि कर्तव्यनिष्ठेचा सर्वत्र गौरव होत आहे.

जावेद अहमद यांची नियुक्ती 179 सीआरपीएफ बटालियनमध्ये जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात होती. त्यांच्या युनिटवर सोपोर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी होती. दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी ते सरकारी वाहनातून आपल्या युनिटसाठी आवश्यक सामग्री घेऊन जात असताना अहदबाबा क्रॉसिंग येथे दबा धरून बसलेल्या उग्रवाद्यांनी त्यांच्या वाहनावर अचानक अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, तरीही अत्यंत धैर्य दाखवत त्यांनी वाहन सुरक्षित ठिकाणी नेले आणि आपली जबाबदारी पूर्ण केली. या गोळीबारात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन त्यांना 74 टक्के अपंगत्व आले. उपचारानंतरही ही इजा कायम राहिली, मात्र तरीही ते आजही सीआरपीएफमध्ये कार्यरत राहून देशसेवेचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. देशासाठी लढताना गंभीर जखमी झालेल्या या वीर जवानाचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या कृतज्ञतेचे प्रतीक ठरला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैनिकी विभागाचे कल्याण संघटक विश्वनाथ उगले यांनी केले. प्रस्ताविकात जिल्हा सैनिक अधिकारी निलेश पाटील यांनी योजनेची माहिती दिली, तर आभार सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी संजय गायकवाड यांनी मानले.

या कार्यक्रमास जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा सैनिक अधिकारी निलेश पाटील, सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी संजय गायकवाड व कल्याण संघटक विश्वनाथ उगले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*********

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *