नगर परिषदेत सभा नाहीत; अमळनेरकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष? जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर , जन्मोत्सव नियोजनासह शहर विकासकामे रखडली; नगरसेवकांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
![]()
नगर परिषदेत सभा नाहीत; अमळनेरकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष? जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर
जन्मोत्सव नियोजनासह शहर विकासकामे रखडली; नगरसेवकांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगर परिषदेतील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दर महिन्याची आवश्यक असलेली सर्वसाधारण सभा न घेतल्यामुळे नागरिकांच्या समस्या प्रलंबित राहिल्याचा आरोप पुढे आला आहे. यासंदर्भात अमळनेर शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे निवेदन सादर करत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
एप्रिल महिन्यात येणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच अमळनेरची प्रसिद्ध अक्षयतृतीया – संत सखाराम महाराज यात्रा उत्सव यांच्या नियोजनासाठी सर्वसाधारण सभा घेणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही सत्ताधाऱ्यांकडून नियमित सभा घेतल्या जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नगरसेवकांच्या मते, या निष्क्रियतेमुळे शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नागरी सुविधा तसेच विविध विकासकामांचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. नागरिकांच्या तक्रारींना योग्य मंच मिळत नसल्याने अमळनेरकरांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर “नागरी प्रश्नांपासून पळ काढण्याचा” गंभीर आरोप करत, दर महिन्याला सर्वसाधारण सभा घेण्याच्या शासन नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनावर नगरसेविका जयश्री अनिल पाटील, स्वप्न विक्रांत पाटील, कविता राजपूत तसेच सचिन कासार, सचिन पाटील, विजय पाटील, भरत कुमार ललवाणी, देवेंद्र कांबळे, प्रवीण पाटील, शोभाबाई कढरे, आदींच्या सह्या आहेत.
आता जिल्हाधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन कोणती भूमिका घेतात, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले असून, नागरी प्रश्नांना न्याय मिळणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

