“स्क्रीन से सावधान” : मुलांच्या भविष्यावर डिजिटल धोक्याची छाया; पालक जागृतीसाठी अमळनेरात उदया विशेष संमेलन , बालकांचे संस्कार, मानसिक आरोग्य व सुरक्षिततेसाठी बीएपीएसकडून पालकांना मार्गदर्शन
![]()
“स्क्रीन से सावधान” : मुलांच्या भविष्यावर डिजिटल धोक्याची छाया; पालक जागृतीसाठी अमळनेरात उदया विशेष संमेलन
बालकांचे संस्कार, मानसिक आरोग्य व सुरक्षिततेसाठी बीएपीएसकडून पालकांना मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही व इतर स्क्रीनचा वाढता वापर मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासावर गंभीर परिणाम करत असल्याची सध्याची चिंताजनक परिस्थिती आहे. लहान वयातच मुलं स्क्रीनच्या आहारी जात असून त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर, वर्तनावर आणि सामाजिक कौशल्यांवर दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पालकांना जागृत करण्यासाठी “आपला बालक – आपले भविष्य” या अभियानांतर्गत “स्क्रीन से सावधान” या विषयावर विशेष पालक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
बी.ए.पी.एस. स्वामिनारायण संस्था, अमळनेर येथील बालप्रवृत्ती कार्यालयाच्या वतीने रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ७:३० या वेळेत बी.ए.पी.एस. स्वामिनारायण मंदिरात हा उपक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये विशेष वर्कशॉप, माहितीपूर्ण व्हिडिओ शो तसेच संतांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनामध्ये स्क्रीनचा अतिरेक मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो, त्यावर उपाययोजना काय असाव्यात, पालकांनी कोणती काळजी घ्यावी, तसेच मुलांमध्ये चांगले संस्कार व योग्य सवयी कशा रुजवाव्यात यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, संतांच्या मार्गदर्शनातून अध्यात्मिक मूल्यांवर आधारित जीवनशैलीचे महत्त्वही पालकांना समजावून सांगितले जाणार आहे.
परम पूज्य महंतस्वामी महाराज पूज्य योगी स्नेह स्वामी,
पूज्य अखंडमुनी स्वामी यांच्या प्रेरणेने आयोजित हा उपक्रम पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने या संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

