समाजसेवेचा ध्यास जपणारे आण्णासाहेब हरीश मराठे
![]()
*समाजसेवेचा ध्यास जपणारे आण्णासाहेब हरीश मराठे…
नंदुरबार जिल्ह्यातील मूळ असलेले आणि नोकरीच्या निमित्ताने कळमसरे येथे स्थायिक झालेले अण्णासाहेब हरीश मराठे हे नाव आज सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेचे प्रतीक बनले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात वायरमन म्हणून जबाबदारी इमाने-इतबारे पार पाडताना त्यांनी कळमसरे गावाशी जुळलेली नाळ कधीही तुटू दिली नाही.
गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत त्यांनी तरुणांसाठी व्यायामशाळा उभारण्याचा संकल्प केला, तर भाविकांसाठी गणपती मंदिराची उभारणीही केली. “सामाजिक सेवा ही रक्तात असावी लागते,” याची प्रचीती त्यांच्या कार्यातून सातत्याने येते. आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचे बाळकडू त्यांनी आयुष्यभर जपले आणि तेच कार्यातून उतरवले.
कळमसरे गावातील सर्व समाजघटकांचा विश्वास संपादन करत, मित्रपरिवाराच्या सहकार्याने त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे पूर्णत्वास नेले. आज त्या उभारलेल्या वास्तू गावाच्या विकासाची साक्ष देत उभ्या आहेत. त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या ग्रामस्थांच्या अपेक्षा त्यांनी नेहमीच सार्थ ठरवल्या.
त्यांच्या पत्नी कै. अनिताताई मराठे या अमळनेर पंचायत समितीच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या. या दांपत्याने समाजसेवा करताना कधीही पद, पैसा किंवा प्रतिष्ठा डोक्यात जाऊ दिली नाही. साधेपणा, मितभाषी स्वभाव आणि प्रेमळ वागणूक यामुळे संपूर्ण गाव त्यांच्यावर प्रेम करत होते आणि आजही करते.
कौटुंबिक जीवनातही त्यांनी मोठ्या जिद्दीने जबाबदाऱ्या पेलल्या. पत्नीच्या आकस्मिक निधनानंतर कुटुंबावर आलेला आघात त्यांनी धैर्याने पेलला. आईची भूमिका स्वीकारत मुला-मुलींना उत्तम शिक्षण, संस्कार देत त्यांना स्वावलंबी बनवले.
अण्णासाहेबांच्या कुटुंबात मुलगा, दोन्ही मुली, जावई व नातवंडे असा सुशिक्षित व सुसंस्कारित परिवार आहे. दोन्ही मुलींचे विवाह उत्तम प्रकारे झाले असून त्यांना मितभाषी व उच्चशिक्षित जावई लाभले आहेत, ही त्यांच्या आयुष्यातील अभिमानाची बाब मानली जाते. संपूर्ण परिवार आज विविध क्षेत्रांत आपापल्या कर्तृत्वाने नाव कमावत आहे.
अण्णासाहेब म्हणजे खऱ्या अर्थाने “देवमाणूस” आणि मैत्रीच्या दुनियेतील “राजा माणूस” म्हणून त्यांची ओळख आहे. कोणत्याही अडचणीत मदतीसाठी धावून जाणारे त्यांचे व्यक्तिमत्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संत गजानन महाराज यांच्या चरणी प्रार्थना—त्यांना निरोगी, दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.
💐🎂 शुभेच्छुक :
ईश्वर आर. महाजन, पत्रकार,
अमळनेर
9860352960




