वडिलांची अपूर्ण इच्छा मुलाने समाजसेवेतून पूर्ण केली; ४५ महिलांना सप्तशृंगी दर्शन , अमळनेर तालुक्यातील गंगापुरी येथील शिक्षक पत्रकार महेंद्र रामोसे यांचा प्रेरणादायी उपक्रम
![]()
वडिलांची अपूर्ण इच्छा मुलाने समाजसेवेतून पूर्ण केली; ४५ महिलांना सप्तशृंगी दर्शन
अमळनेर तालुक्यातील गंगापुरी येथील शिक्षक पत्रकार महेंद्र रामोसे यांचा प्रेरणादायी उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी :
वडिलांची अखेरची इच्छा अपूर्ण राहिल्याची खंत मनात बाळगत एका मुलाने ती इच्छा समाजसेवेच्या माध्यमातून पूर्ण करत अनोखा आदर्श निर्माण केला आहे. अमळनेर तालुक्यातील गंगापुरी येथील शिक्षक तथा पत्रकार महेंद्र रामोसे यांनी गावातील ४५ महिलांना स्वखर्चाने सप्तशृंगी गडावर नेऊन देवीचे दर्शन घडवले.
गंगापुरी येथील भीमराव किसन रामोसे (वय ७९) हे दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे दीर्घकाळ अंथरुणाला खिळलेले होते. मृत्यूशी झुंज देत असताना त्यांनी आपल्या मुलगा महेंद्र रामोसे यांच्याकडे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाण्याची अखेरची इच्छा व्यक्त केली. वडिलांची ही इच्छा ऐकून मुलाच्याही डोळ्यांत पाणी आले. शाळेच्या कामातून वेळ काढून सुट्टीच्या दिवशी वडिलांना गडावर घेऊन जाण्याचा त्यांनी निर्धार केला होता. मात्र, नियतीने वेगळाच निर्णय घेतला आणि त्यापूर्वीच वडिलांचे निधन झाले.
वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण करता आली नाही, ही खंत महेंद्र रामोसे यांच्या मनाला सतत बोचत राहिली. अखेर त्यांनी ठरवले की, ही इच्छा वेगळ्या मार्गाने पूर्ण करायची. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या आईच्या सहकार्याने गावातील ४५ गरजू महिलांना एकत्र केले आणि त्यांना स्वखर्चाने सप्तशृंगी गडावर नेऊन देवीचे दर्शन घडवले.
या उपक्रमातून ‘भक्ती आणि श्रद्धा कोणत्याही मार्गाने पूर्ण करता येते’ हा संदेश त्यांनी कृतीतून दिला. गावातील महिलांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत महेंद्र रामोसे यांच्या कर्तृत्वाला दाद दिली. त्यांच्या या कार्यामुळे समाजात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
खूपच प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी उपक्रम
वडिलांची अपूर्ण इच्छा अशा सुंदर पद्धतीने पूर्ण करत ४५ महिलांना सप्तशृंगी देवीचे दर्शन घडवणे, हे खरोखरच समाजासाठी आदर्श ठरणारे कार्य आहे.
पत्रकार मित्र महेंद्र रामोसे सरांचे हे कार्य केवळ कर्तव्यपूर्ती नाही, तर संस्कार, श्रद्धा आणि समाजभान यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.आमचे पत्रकार मित्र रामेशे सरांना मनापासून सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!
🙏🙏🙏🌹मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क परिवार

