“बँकेत कर्मचाऱ्यांना सुविधा, शेतकऱ्यांना उपेक्षा!” — अमळनेर जेडीसीसी शाखेत संतापाचा उद्रेक काँग्रेसचे शाखाधिकारी यांना निवेदन
![]()
“बँकेत कर्मचाऱ्यांना सुविधा, शेतकऱ्यांना उपेक्षा!” — अमळनेर जेडीसीसी शाखेत संतापाचा उद्रेक
काँग्रेसचे शाखाधिकारी यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) अमळनेर येथील कॉटन मार्केट शाखेत ग्राहकांच्या मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचा प्रकार समोर आला असून, उन्हाच्या तीव्र झळांमध्ये शेतकरी ग्राहकांना अक्षरशः घाम गाळत रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दि. २४ मार्च २०२६ रोजी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी.के. सूर्यवंशी व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संदीप घोरपडे हे काँग्रेस कमिटीचे खाते उघडण्यासाठी शाखेत आले असता, मार्च एंडमुळे मोठी गर्दी उसळलेली होती. प्रत्येक काउंटरसमोर लांबलचक रांगा लागल्या होत्या. उन्हाळ्याच्या कडक वातावरणात शेतकरी ग्राहकांना उभे राहणेही कठीण जात होते.
यावेळी संतप्त शेतकरी ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, “कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पंखे फिरत आहेत, पण आमच्यासारख्या ग्राहकांसाठी साधी पंख्याची किंवा पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. ज्यांच्या जीवावर बँक चालते, त्यांच्याच सोयींकडे दुर्लक्ष का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, वयोवृद्ध ग्राहकांसाठी बसण्याची कोणतीही सोय नसल्याने त्यांना अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी थेट बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्याशी संपर्क साधण्याची मागणी केली. यानुसार, पदाधिकाऱ्यांनी चेअरमन यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली व त्वरित उपाययोजना करण्याची विनंती केली.
यानंतर तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाखा व्यवस्थापकांना लेखी निवेदन देण्यात आले. यामध्ये बँकेच्या इमारतीच्या बाहेरील परिसरात शेतकरी ग्राहकांसाठी पंखे, पिण्याचे पाणी आणि बसण्याची व्यवस्था तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष बी.के. सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, डॉ. प्रकाश सोनवणे, प्रा. सुरेश विक्रम पाटील, काशिनाथ वना पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष हर्षल जाधव, सरचिटणीस राजू भाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शेतकरी ग्राहकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल बँक प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.

