अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार बोगस; नगरसेवक नविद शेख यांचा आंदोलनाचा इशारा
![]()
अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार बोगस; नगरसेवक नविद शेख यांचा आंदोलनाचा इशारा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून, रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, या मागणीसाठी नगरसेवक नविद शेख यांनी वैद्यकीय अधीक्षकांना खरमरीत निवेदन दिले आहे.
रुग्णांना विनाकारण धुळे येथे ‘रेफर’ करण्याच्या प्रकारामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी या निवेदनात केला आहे.
प्रमुख तक्रारी आणि समस्या:
विनाकारण ‘रेफर’ करण्याचे प्रमाण वाढले असून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्याऐवजी त्यांना थेट धुळे येथे हलविण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे गरिबांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना तातडीने धुळे येथे पाठवले जाते. प्रवासातील विलंबामुळे माता आणि बालकाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता निवेदनात वर्तवण्यात आली आहे. रुग्णालयात पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध असतानाही, केवळ जबाबदारी टाळण्यासाठी वैद्यकीय अधिकारी रुग्णांना इतरत्र हलवत असल्याचे नविद शेख यांनी म्हटले आहे.
”रुग्णालयात सोयीसुविधा असतानाही रुग्णांना बाहेर पाठवणे हा वैद्यकीय सेवेतील हलगर्जीपणा आहे. यापुढे उपचारात हलगर्जीपणा झाल्यास आणि कोणतीही जीवितहानी झाल्यास, त्यास सर्वस्वी ‘वैद्यकीय अधीक्षक’ जबाबदार राहतील.”
— नविद शेख, नगरसेवक.
तात्काळ कारवाईची मागणी
नगरसेवक नविद शेख यांनी पत्राद्वारे विनंती केली आहे की, संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक ताकीद देण्यात यावी आणि रुग्णांवर अमळनेरमध्येच योग्य उपचार होतील याची दक्षता घ्यावी. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तातडीने सुधारणा न केल्यास आगामी काळात तीव्र भूमिका घेण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

