गुरुवंदना’तून गुरु-शिष्य परंपरेचा सुरेल जागर; १६ ऑगस्टला अमळनेरात विशेष सोहळा
![]()
गुरुवंदना’तून गुरु-शिष्य परंपरेचा सुरेल जागर; १६ ऑगस्टला अमळनेरात विशेष सोहळा
बासरीच्या सुरांतून गुरुजनांप्रती कृतज्ञता; देश-विदेशातील शिष्यांची उपस्थिती
अमळनेर प्रतिनिधी : गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बासरीच्या मधुर सुरांचा अनोखा आविष्कार अमळनेरात रंगणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर बासरी क्लासतर्फे ‘गुरुवंदना’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे हा सुरेल सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तबला वादक श्री. योगेश संदनशिव उपस्थित राहणार आहेत. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन प्रस्तावना, गुरुपूजन (सपत्नीक), शिष्यांचे मनोगत, शिष्यांचे सादरीकरण आणि सामूहिक बासरी वादन अशा विविध कार्यक्रमांची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.
यावेळी पाहुण्यांचा सत्कार, सोलो वादन, गुरुजींचे सादरीकरण, आभार प्रदर्शन तसेच स्नेहभोजन असे कार्यक्रमाचे स्वरूप राहणार आहे. त्यामुळे गुरुभक्ती, संगीतसाधना आणि गुरु-शिष्य नात्याचा भावबंध या कार्यक्रमातून अनुभवायला मिळणार आहे.
‘गुरुवंदना’साठी अमळनेर व जळगाव जिल्ह्यासह धुळे, नाशिक, पुणे, मुंबई, डोंबिवली आणि शिरपूर आदी विविध ठिकाणांहून शिष्य सहभागी होणार आहेत. याशिवाय मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली तसेच नेपाळ, सौदी अरेबिया, अमेरिका, लंडन आणि जर्मनी येथील शिष्यांचाही सहभाग असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
बासरीच्या माध्यमातून भारतीय संगीत परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या या उपक्रमात गुरु-शिष्य परंपरेचा गौरव आणि शिष्यांच्या कलागुणांचे सादरीकरण पाहायला मिळणार आहे. देश-विदेशातील शिष्यांना एका सुरेल व्यासपीठावर एकत्र आणणारा हा सोहळा अमळनेरच्या सांस्कृतिक विश्वात विशेष ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी २४ आयोजकांची टीम कार्यरत असून, संगीतप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक नाट्यकर्मी श्री. संदीप घोरपडे सर यांनी केले आहे.

