मोबाईलला दोन तास ‘नो एंट्री’!  ,अमळनेरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा अभिनव उपक्रम , सायंकाळी ७ ते ९ अभ्यास, वाचनासाठी राखीव; नगर परिषद व PTAच्या संयुक्त उपक्रमाचा मानस
1 min read

मोबाईलला दोन तास ‘नो एंट्री’! ,अमळनेरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा अभिनव उपक्रम , सायंकाळी ७ ते ९ अभ्यास, वाचनासाठी राखीव; नगर परिषद व PTAच्या संयुक्त उपक्रमाचा मानस

Loading

मोबाईलला दोन तास ‘नो एंट्री’!

अमळनेरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा अभिनव उपक्रम

सायंकाळी ७ ते ९ अभ्यास, वाचनासाठी राखीव; नगर परिषद व PTAच्या संयुक्त उपक्रमाचा मानस

अमळनेर प्रतिनिधी:

मोबाईल आणि टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, एकाग्रता आणि वाचनाची सवय प्रभावित होत असताना, अमळनेरमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा आणि सकारात्मक उपक्रम पुढे आला आहे. विद्यार्थ्यांनी दररोज दोन तास मोबाईल व टीव्हीपासून दूर राहून अभ्यास, वाचन आणि ज्ञानार्जनाला वेळ द्यावा, या उद्देशाने PTA क्लासेस संघटनेतर्फे ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’ हा अभिनव उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

या उपक्रमासंदर्भात PTA पदाधिकाऱ्यांनी अमळनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. प्रशांत निकम तसेच शिक्षण सभापती श्री. नविद शेख यांची भेट घेऊन उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. या संकल्पनेचे दोन्ही मान्यवरांनी स्वागत करून सकारात्मक प्रतिसाद दिला. नगर परिषद आणि PTA यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच हा उपक्रम कार्यान्वित करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

सायंकाळी ७ वाजता सायरन; ‘अभ्यासाची वेळ सुरू’

या उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून अभ्यास, वाचन व ज्ञानार्जनासाठी वेळ द्यावा, अशी संकल्पना आहे. सायंकाळी ७ वाजता विशेष सायरन वाजवून संपूर्ण शहरातील विद्यार्थ्यांना ‘अभ्यासाची वेळ सुरू झाली’ असा संदेश देण्याची कल्पना आहे.

दोन तासांचा संकल्प, भविष्यासाठी मोठी चळवळ

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्याबरोबरच त्यांच्यामध्ये स्व-अनुशासन, वेळेचे नियोजन आणि अभ्यासाची सकारात्मक सवय निर्माण व्हावी, हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. हा उपक्रम केवळ PTA किंवा नगर परिषदेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संपूर्ण अमळनेर शहराने स्वीकारलेली शैक्षणिक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

‘दोन तासांचा छोटासा संकल्प; विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी चळवळ!’ या विचारातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी अमळनेरने एक आदर्श निर्माण करावा, असा मानस PTA पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या भेटीप्रसंगी PTA अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, सौ. सुरश्री वैद्य, सुधीर टाकणे, सौ. वैशाली निकम, मयूर भावसार, स्वर्णदीप राजपूत आदी PTA पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *