खवशी गावालगतचा पाणलोट बंधारा ठरतोय गावासाठी ‘जीवनदायी वरदान’! , तीव्र पाणीटंचाईवर मात करत शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला मार्गी
1 min read

खवशी गावालगतचा पाणलोट बंधारा ठरतोय गावासाठी ‘जीवनदायी वरदान’! , तीव्र पाणीटंचाईवर मात करत शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला मार्गी

Loading

खवशी गावालगतचा पाणलोट बंधारा ठरतोय गावासाठी ‘जीवनदायी वरदान’!

तीव्र पाणीटंचाईवर मात करत शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला मार्गी

अमळनेर प्रतिनिधी
(दिनकर पवार)

खवशी गावाच्या तिन्ही दशकांच्या इतिहासाकडे पाहिले तर, या परिसरात सिंचनासाठी कोणतेही प्रभावी साधन उपलब्ध नसल्यामुळे गावाला दीर्घकाळ तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असे, तर अनेकदा शेतातील विहिरी, हातपंप किंवा दूरवर भटकंती करून पाणी मिळवावे लागत होते. त्यामुळे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन अक्षरशः पाण्यासाठी संघर्षमय झाले होते.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सन १९९९-२००० दरम्यान नवल भाऊ प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दहा गावे दत्तक घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्या वेळी संस्थेत कार्यरत असलेले सध्याचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी व कैलास पाटील यांनी पुढाकार घेत खवशी गावाचा या योजनेत समावेश करून घेतला. त्यांच्या दूरदृष्टीतून या भागासाठी जलसंधारणाची भक्कम पायाभरणी झाली.
या उपक्रमांतर्गत परिसरात सहा पाणलोट बंधारे, एक मातीचा बंधारा तसेच शेततळ्यांना मंजुरी मिळाली. त्याचाच भाग म्हणून ग्रामपंचायत मालकीच्या शेताजवळ, खवशी गावालगत भक्कम पाणलोट बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. यामुळे शिवारातून वाहून जाणारे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर अडवले जाऊ लागले आणि त्यातून जलसाठ्याचे पुनर्भरण सुरू झाले.
दरवर्षी या बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम नियमितपणे केले जात असल्याने बंधाऱ्याची खोली व साठवण क्षमता वाढत गेली. आज या बंधाऱ्यात लाखो लिटर पाण्याची साठवण क्षमता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम परिसरातील विहिरी, कूपनलिका आणि जलस्त्रोतांवर दिसून येत आहे. विशेषतः ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या कूपनलिकेला मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने गावाच्या पाणीपुरवठ्याला एक प्रकारे ‘जीवनवाहिनी’ मिळाली आहे.
या जलसंधारण प्रकल्पामुळे आता खवशी गावाला पूर्वीसारखी पाणीटंचाईची झळ बसत नाही. नागरिकांना पाण्यासाठी होणारी धावपळ थांबली असून, त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांनाही मोठा फायदा झाला असून, शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध झाल्यामुळे बागायती शेतीत वाढ झाली आहे.
पावसाळ्यात हा बंधारा चार-पाच वेळा ओसंडून वाहिल्यास परिसरात मोठ्या प्रमाणावर भूजल पुनर्भरण होते, ज्यामुळे जलपातळी व पाण्याची साठवण क्षमता वाढते. त्यामुळे हा पाणलोट बंधारा केवळ एक प्रकल्प न राहता गावाच्या विकासाचा आधारस्तंभ ठरत आहे.
बी. के. सूर्यवंशी व कैलास पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेला हा पाणलोट बंधारा आज खवशी गावासाठी खऱ्या अर्थाने ‘जीवनदायी वरदान’ ठरत असून, जलसंधारणाच्या यशस्वी मॉडेलचे उत्कृष्ट उदाहरण बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *