वारकरी परंपरेचा जागर: ह.भ.प. दिनेश महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन ३० मार्च रोजी
1 min read

वारकरी परंपरेचा जागर: ह.भ.प. दिनेश महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन ३० मार्च रोजी

Loading

वारकरी परंपरेचा जागर: ह.भ.प. दिनेश महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन ३० मार्च रोजी

अमळनेर प्रतिनिधी :
श्री क्षेत्र मालखेडा येथे वारकरी संप्रदायाच्या पवित्र परंपरेला उजाळा देणारा एक भक्तिमय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कै. बापूसो भिका कृष्णा पाटील यांच्या उत्तरकार्याच्या पूर्वसंध्येला, दि. ३० मार्च २०२६ रोजी प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. दिनेश महाराज फरकांडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
कै. भिका बापू हे वारकरी संप्रदायाचे निष्ठावान प्रचारक होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, त्यांच्या कार्याचा आणि आध्यात्मिक वारशाचा गौरव करण्याचा हा प्रयत्न आहे.
बापूंनी आपल्या सुमारे ७५ वर्षांच्या आयुष्यात तब्बल ३५ पंढरपूर वाऱ्या केल्या, त्यापैकी ५ वाऱ्या पायी पूर्ण केल्या तर उर्वरित वाऱ्या बसने पूर्ण केल्या. अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन येथील दिंडीला त्यांनी सलग ३० वर्षे अन्नदान करून भक्ती आणि सेवाभाव जपला. तसेच आळंदीच्या सुमारे २० वाऱ्या, चांगदेव, मुक्ताई आदी तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या करून त्यांनी वारकरी परंपरेचा दीप प्रज्वलित ठेवला.
मालखेडा गावात अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा त्यांनी अखंडितपणे जपली. भजन, कीर्तन, प्रवचन यांचा त्यांना दांडगा व्यासंग होता. पंचक्रोशीतील कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असायचीच. श्रावण महिन्यात रामायण, महाभारत, श्रीकृष्ण अवतार, शिवलीलामृत यांसारख्या ग्रंथांचे वाचन करून त्यांनी समाजमनात अध्यात्माची बीजे रुजवली.
गावातील कुलदैवत आई एकविरा माता मंदिराच्या बांधकामात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच वार्धक्यात वारी करणे शक्य नसल्याने त्यांनी स्वतःच्या खर्चाने मंदिराशेजारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारून तेथेच सेवा सुरू ठेवली. पंढरीच्या वारीसाठी ते पंधरा दिवस आधीच तयारी करत आणि कुटुंबीयांना सोबत घेऊन भक्तिमय वातावरण निर्माण करत.
वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, भजनी मंडळ यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. अध्यात्मिक ग्रंथसंग्रह करण्याचाही त्यांना छंद होता, ज्यातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले.
त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित या कीर्तन सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांचे जेष्ठ पुत्र
प्रदीप भिका पाटील व उपक्रमशील शिक्षक शरद भिका पाटील यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *