वादळाच्या तडाख्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्यासाठी तहसिलदारांकडे भावनिक निवेदन , मांडळ परिसरातील शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेले पीक नष्ट; तातडीने नुकसान भरपाईची मागणी
![]()
वादळाच्या तडाख्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्यासाठी तहसिलदारांकडे भावनिक निवेदन
मांडळ परिसरातील शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेले पीक नष्ट; तातडीने नुकसान भरपाईची मागणी
अमळनेर प्रतिनिधी) :
अमळनेर तालुक्यातील मांडळ व परिसरात दि. १९ मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा आलेल्या जोरदार वादळ व वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. निसर्गाच्या या अचानक कोपामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक क्षणात हिरावून गेले आहे.
या वादळामुळे मका, ज्वारी, गहू, हरभरा तसेच लिंबू बागांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय जनावरांसाठी तयार केलेला चारा देखील उध्वस्त झाल्याने दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या आपत्तीने आणखी घाव घातला आहे.
या पार्श्वभूमीवर, मांडळ येथील सरपंच सौ. कविता दिपक बडगुजर, मा. पंचायत समिती सभापती डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील व सामाजिक कार्यकर्ते श्री दिपक काशिनाथ बडगुजर यांनी तहसिलदार, अमळनेर यांना निवेदन सादर केले आहे. सदर निवेदन महसूल विभागातील फौजदारी शाखेतील वरिष्ठ लिपिक श्री अनिल चौधरी यांच्याकडे देण्यात आले.
निवेदनात, कृषी विभागामार्फत तात्काळ पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत व शासनाकडे प्रस्ताव सादर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी नम्र पण ठाम मागणी करण्यात आली आहे.
यावेळी परिसरातील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशीच भावना या निवेदनातून व्यक्त होत आहे.

